अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी कार्य,इंडिया 30 अंडर 30 लिस्टममध्ये सामील
लखनौच्या लेखिका, वकील आणि समाजसेविका पौलोमी पाविनी शुक्ला यांना फोर्ब्सकडून प्रसिद्ध ‘ इंडिया 30 अंडर 30’ या यादीत स्थान मिळाले आहे. 30 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पण स्वतःच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 30 व्यक्तींची यादी फोर्ब्स नियतकालिक दरवर्षी प्रसिद्ध करते. पाविनी यांचे नाव अनाथ मुलांच्या शिक्षणासाठी करण्यात आलेल्या कार्यामुळे या यादीत सामील करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयात वकील असलेल्या पाविनी यांनी भारतातील अनाथ मुलांच्या दुर्दशेवर 2015 मध्ये स्वतःच्या भावासोबत मिळून ‘वीकेस्ट ऑन अर्थ- ऑरफन्स ऑफ इंडिया’ नावाचे पुस्तक लिहिले होते. फोर्ब्सच्या यादीत नाव आल्याने अनाथ मुलांसाठी अधिक काम करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्या सांगतात. पाविनी या वरिष्ठ आयएएस अधिकारी आराधना शुक्ला आणि प्रदीप यांच्या कन्या आहेत.
अनाथ मुलांसाठी त्यांनी लखनौमध्ये ‘अडॉप्ट ऍन ऑरफेंज’ कार्यक्रम सुरू केला आहे. त्यांना या कामात स्थानिक उद्योगांकडून मदत मिळाली आहे. टाळेबंदीत पाविनी यांनी शहरातील सर्व अनाथाश्रमांमध्ये स्मार्ट टीव्ही बसवून तेथे राहणाऱया मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळावे यादृष्टीने प्रयत्न केले आहेत.