प्रतिनिधी/कोल्हापूर
सहकार आणि सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि येथील ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंधशाळेचे अध्यक्ष प्रकाशराव परशराम बोंद्रे (वय 69, रा. मर्दानी खेळाचा आखाडा जवळ, राजघाट रोड, शिवाजी पेठ) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा डॉ. सुहास, सून, नातू, भाऊ, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी (19 जुलै) सकाळी 8ः30 वाजता पंचगंगा स्मशानभूमीत आहे.
राजकीय, सामाजिक कार्याचा वारसा लाभलेल्या बोंद्रे घराण्यात जन्मलेल्या प्रकाशराव बोंद्रे यांचा अभ्यासू कार्यकर्ता म्हणून लौकिक होता. त्यांनी विविध संस्थांमध्ये काम केले. जयसिंगपूरच्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ तालुका सूत गिरणीचे ते संस्थापक उपाध्यक्ष होते. महाराष्ट्र स्टेट कंझुमर्स फेडरेशन, पुण्याचे सहकारी प्रादेशिक मंडळ, जनता सेंट्रल कंझ्युमर्स स्टोअर, कोल्हापूर, पुण्याच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघ आदी संस्थांवर ते संचालक म्हणून कार्यरत होते. नवी दिल्लीच्या नॅशनल कंझ्युमर्स फेडरेशनच्या पश्चिम विभागाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. तरुण वयात त्यांनी जिल्हा युवक काँगेस कमिटीच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी पार पाडली होती. विविध सामाजिक, शैक्षणिक संघटनांशीही त्यांचा संबंध होता. माजी महापौर शोभा बोंद्रे यांचे ते दीर तर फुलेवाडी सोसायटीचे संचालक पंडीतराव बोंद्रे यांचे बंधू होत. माजी नगरसेवक इंद्रजित बोंदे यांचे ते चुलते होत.