चंदिगढ : अलीकडेच झालेल्या पंजाबमधील विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणाऱया माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी सरकारी पेन्शन सोडण्याची घोषणा केली. प्रकाशसिंह बादल यांचा हवाला देत अकाली दलाने यासंबंधी ट्विट केले आहे. ते पाचवेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. तसेच दहावेळा विधानसभा निवडणुकीत विजयाला गवसणी घातली होती. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या रणसंग्रामात त्यांचा पराभव झाला होता.
माजी आमदार म्हणून मिळणारी सरकारी पेन्शन किंवा भत्ते आपल्याला देऊ नयेत अशी विनंती बादल यांनी पंजाब सरकार आणि सभापतींना केली आहे. यासंदर्भात सरकारला औपचारिक पत्रही पाठवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता सदर रकमेचा वापर राज्याच्या हितासाठी आणि विकासासाठी करण्यात यावा, असे त्यांनी सुचवले आहे. त्यांना सुमारे पाच लाख रुपये पेन्शन मिळण्याची चर्चा होती. मात्र, यासंबंधी अधिकृतपणे कोणीही दुजोरा दिलेला नाही.