मुंबई \ ऑनलाईन टीम
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे तीन महिन्याच्या दीर्घ सुट्टीवर गेले आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी स्वत: ट्विटरवरून एक व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी स्वत: तीन महिने पक्षात कार्यरत राहणार नाही. या काळात कोणत्याही कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. माझ्या व्यक्तिगत कारणासाठी मी तीन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष चालला पाहिजे. संघटन चाललं पाहिजे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. त्यासाठी पक्षाला अध्यक्ष हवा. त्यामुळे रेखाताई ठाकूर यांची महाराष्ट्र प्रदेशच्या प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही सर्व रेखाताई ठाकूर यांना सहकार्य कराल आणि पाच जिल्ह्यातील निवडणुकीमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल कराल अशी आशा आहे, असं आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
आंबेडकर यांनी वैयक्तिक कारणांसाठी सुट्टीवर जात असल्याचं म्हटलं आहे. मात्र आंबेडकर निवडणूक काळातच सुट्टीवर जात असल्याने राजकीय वर्तुळात मात्र विविध चर्चांणा उधाण आले आहे.