वृत्तसंस्था / बेंगळूर
काही दिवसापूर्वी भारताचे माजी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू तसेच माजी अखिल इंग्लंड स्पर्धेतील विजेते प्रकाश पदुकोन यांना कोरोनाची बाधा झाल्याने हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय इलाजासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आल्याने त्यांना हॉस्पिटलमधून घरी जाण्यास डॉक्टरांनी परवानगी दिली आहे. प्रकाश पदुकोन यांना ताप येत असल्याने 1 मे रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोना चांचणी घेण्यात आली आणि ते पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. पदुकोन यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. पण ते सर्व सदस्य आपल्याच घरातील आयसोलेशननंतर पूर्ण बरे झाले. 65 वर्षीय प्रकाश पदुकोन यांनी 1980 साली अखिल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्यांनी 1981 साली या स्पर्धेत अंतिम फेरी गाठली होती. अखिल इंग्लंड स्पर्धेचे विजेतेपद मिळविणारे प्रकाश पदुकोन हे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू आहेत. 1983 साली झालेल्या विश्व़ बॅडमिंटन स्पर्धेत पदुकोन यांनी कांस्यपदक मिळविले होते.