प्रतिनिधी – इस्लामपूर
कोविड रुग्णाच्या उपचारासाठी शासनाने निर्धारीत केलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कमेची मागणी करत मागासवर्गीय रुग्णाच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा प्रकार प्रकाश हॉस्पिटलमध्ये घडला आहे. याप्रकरणी इंद्रजीत पाटील, अभिमन्यु पाटील, विश्वजित पाटील, प्रविण माने व एका अज्ञात इसमाविरोधात फसवणूक व अट्रोसिटी अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश हॉस्पीटल येथे काम करणारे इंद्रजित पाटील यांनी नंदू कांबळे यांचे मामा काशिनाथ शंकर कांबळे (वय ६६ रा.धरणगुत्ती ता.शिरोळ जि.कोल्हापूर) यांना कोरोना आजार झाल्याने उपचारासाठी प्रकाश हॉस्पीटल येथे अॅडमिट करुन घेतले. शासनाने निर्धारीत केलेल्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कम ३ लाख ५० हजार रुपये व्हेंटीलेटर बेड व मेडीकल बिलाची अनामत रक्कम घेतली. काशिनाथ कांबळे हे तेथे उपचार घेत असताना मयत झाल्यानंतर त्यांच्यावर केलेल्या उपचाराचे आणखी २ लाख १७ हजार ५१२ रुपयांची मागणी केली.
यापुर्वी ३ लाख ५० हजार रुपये उपचाराकरीता दिले आहेत. असे नंदू कांबळे यांनी सांगितले. तरीही हॉस्पीटल मधील अभिमन्यु पाटील, विश्वजित पाटील, प्रविण माने व एका अज्ञात इसमाने तुम्ही एवढे पैसे दिलेच कशावरुन, तुम्ही कोणाला रक्कम दिली, पावती न देता त्यांच्या कडे एवढी रक्कम दिलीच का तुमच्याकडे काय प्रुफ आहे, रक्कम भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा अशी धमकी व दमदाटी केली. नंदू कांबळे यांच्याशी वादावादी करुन काशिनाथ कांबळे यांचा मृतदेह दि.१८ मे २०२१ रोजी सकाळ पासुन दुपारपर्यंत नातेवाईकांच्या ताब्यात न देता मृतदेहाची विटंबना केली. याबाबतची फिर्याद नंदू नामदेव कांबळे यांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहेत.