शनिवारी रात्री मुंबईत झाले निधन : रविवारी सकाळी अंधेरीत अंत्यसंस्कार
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
ज्यांच्या नाटय़गीतांनी तमान मराठीजनांचे कान व मने तृप्त झाली ते गोमंतकीय सुपुत्र व विख्यात गायक रामदास कामत (90) यांचे शनिवारी रात्री विलेपार्ले मुंबई येथे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अंधेरी येथील पारसीवाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर काल रविवारी अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पुत्र कौस्तुभ व अन्य परिवार आहे.
रामदास कामत हे मूळ गोमंतकीय असून साखळी हे त्यांचे गाव. मात्र नोकरी व संगीत कारकिर्दीमुळे त्यांचे पूर्ण हयात मुंबईत गेली. मुळातच गायनोपयुक्त गळा आणि संगीताची आवड असल्याने त्यांचे वडिल बंधू उपेंद्र कामत यांनी त्यांना गायनाचे प्राथमिक धडे दिले. पुढे नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत स्थायिक झाले. धी गोवा हिंदू असोसिएशनच्या ‘सं. संशयकल्लाळ’ या नाटकातील अश्विन शेट ही त्यांची भूमिका बरीच गाजली व एक उत्तम गळय़ाचा गायक नट म्हणून त्यांची मराठी संगीत रंगभूमिवर ओळख निर्माण झाली. शास्त्रीय संगीताचीही त्यांना चांगली जाण होती. काही शास्त्रीय मैफलीतूनही त्यांनी गायन सादर केले होते.
अठरा नाटकांतून गाजवली रंगभूमी
रामदार कामत यांनी 18 संगीत नाटकांमधून काम केले. सं. शारदा, सं. सौभद्र, सं. मानापमान, सं. मंदारमाला, सं. मत्सगंधा, सं. एकच प्याला, सं. हे बंध रेशमाचे, सं. ययाती व देवयानी आदी नाटकांचा त्यात समावेश आहे. नाटय़क्षेत्रातील बुजुर्ग संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी, पं. भिमसेन जोशी पं. गोविंदबुवा अग्नी, पं. भालचंद्र पेंढारकर यांचा सहवास आणि मार्गदर्शनामुळे त्यांची गायन कला बहरली. नाटय़गीतांबरोबरच भावगीतेही ते उत्तम गायचे. भावसंगीतातील ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांची तालमही त्यांना लाभली. गोमंतकीय नाटककार आणि लेखक गोपाळकृष्ण भोबे यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी नाटय़क्षेत्रातील आपले स्थान पक्के केले. गोव्यातील दिग्गज रंगकर्मी दत्ताराम गोपिनाथ सावकार यांच्यासारख्या दिग्दर्शकामुळे अभिनय क्षेत्रातही त्यांना लोकप्रियता लाभली.
धी गोवा हिंदू असोसिएशनच्या सं. मत्स्यगंधा नाटकात त्यांनी साकारलेली भूमिका अजरामर ठरली. देवाघरचे ज्ञात कुणाला, गुतता हृदय हे, नको विसरु संकेत मिलनाचा, साद देती हिमशिखरे या त्यांनी गायिलेल्या नाटय़गीतांनी श्रोत्यांचे कान व मने तृप्त केली.
सहा दशके संगीत नाटय़ाची साधना
साधरण सहा दशके त्यांनी संगीत साधना केली. मुंबईत नाटय़संगीताचे वर्गही त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालत. सन 2009 मध्ये झालेल्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. संगीत व नाटय़ क्षेत्रातील योगदानाबद्दल सन 2015 साली नाटय़ अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्यांच्या निधनामुळे मराठी नाटय़ व संगीत क्षेत्राबरोबरच गोव्यातील त्यांच्या असंख्य चाहत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
संगीत रत्न हरपले : पं. कमलाकर नाईक (शास्त्रीय गायक)
रामदास कामत हे खऱया अर्थाने रंगभूमीचे सेवक होते. त्याच्या जाण्याने नाटय़संगीताची मोठी हानी झाली आहे. त्यांचा कंठ दुर्मिळ होता. कुठल्याही नाटय़ागीतावर ते उत्तम संस्कार घडवित. ते खऱया अर्थाने संगीत रत्न या बिरुदावलीस पात्र होते.
संगीत नाटकांना श्रीमंती दिली : धर्मानंद गोलतकर (नाटय़ व संगीत कलाकार)
संगीतरत्न रामदास कामत यांनी संगीत नाटकांना श्रीमंती दिली. नाटकातील त्यांची उपस्थिती ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच असायची. संगीत नाटय़ क्षेत्रातील ते एक चमत्कार होते. त्यांच्या जाण्याने नाटय़क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
संगीत नाटय़कातील तपस्वी होते : रवींद्र आमोणकर (नाटय़दिग्दर्शक व अभिनेते)
गोव्याचे रामदास कामत हीच गोमंतकीय नाटय़प्रेमींसाठी मोठी ओळख होती. साठोत्तर संगीत नाटकांसाठीच्या त्यांच्या योगदानामुळे संगीत नाटकांना पुर्नवैभव प्राप्त झाले. रामदास कामत हे नाटय़ संगीत क्षेत्रातील तपस्वी होते.
नाटय़संगीताला उच्च शिखरावर नेले : मधुकर जोशी (नाटय़दिग्दर्शक व नाटय़कर्मी)
नाटय़संगीत व संगीत नाटय़ ज्या कलाकारांमुळे तरले त्यात रामदास कामत यांचा सिंहाचा वाटा आहे. नाटकातील त्यांची गाणी प्रेक्षकांना मनापासून आवडत. नाटय़संगीताला उच्च शिखरावर नेण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या निधनामुळे संगीतही पोरके झाले आहे.
त्यांची नाटय़गीते मनाला तृप्त करीत : सुदिन ढवळीकर (आमदार, मडकई)
गोमंतकीय गायकांसाठी रामदास कामत हे आदर्श होते. आजही त्यांची नाटय़गीते ऐकताना मन प्रसन्न होते. धी गोवा हिंदू असोसिएशनला त्यांच्या रुपाने रत्न गवसले. आपली नोकरी सांभाळुन त्यांनी केलेली संगीत सेवा ही अविस्मरणीय आहे. आपल्या मतदार संघातील कुंडई गावचे ते जावई होते, याचा अभिमान वाटतो. त्यांच्या निधनामुळे दुःख झाले.