वयाच्या 61 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशात एका वृत्तवाहिनीचे पत्रकार म्हणून काम करणारे कमाल खान यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत रिपोर्टिंग केलेल्या कमाल खान यांची शुक्रवारी सकाळी प्रकृती बिघडली आणि काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.
61 वर्षीय कमाल हे मागील 3 दशकांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. त्यांच्या पत्नी रुची देखील लखनौमध्ये एका वृत्तवाहिनीच्या ब्युरो प्रमुख आहेत. कमाल यांच्या निधनाची माहिती कळताच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि अन्य नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.
कमाल खान यांचे निधन हे पत्रकारितेच्या क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी आहे. कमाल हे चौथा स्तंभ आणि निष्पक्ष पत्रकारितेचे एक दृढ पहारेकरी होती. देवाने त्यांच्या आत्म्याला शांती द्यावी असे योगींनी म्हटले आहे. बसप अध्यक्षा मायावती यांनीही कमाल यांच्या आकस्मिक मृत्यूवर संवेदना व्यक्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच कमाल यांची भेट झाली होती असे म्हणत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका वड्रा यांनीही दुःख व्यक्त केले आहे.