म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे, सांगे पालिका निवडणूक
प्रतिनिधी / पणजी
उद्या शुक्रवारी दि. 23 एप्रिल रोजी होणाऱया 5 पाच पालिकांच्या निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली असून त्यांचा जाहीर प्रचार काल बुधवारी सायंकाळी संपुष्टात आला. त्याशिवाय दोन ग्राम पंचायतींच्या दोन प्रभागांसाठी देखील त्याचदिवशी निवडणूक होणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पालिका निवडणुका ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा एकादा गती घेतली आहे.
म्हापसा, मडगाव, मुरगाव, केपे, सांगे या पाच पालिकांची निवडणूक शुक्रवारी 23 एप्रिल रोजी ठरल्याप्रमाणे होणार असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. म्हापसा -20, मुरगाव -25, मडगाव 25, केपे-13, तर सांगेत 10 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. त्याशिवाय डिचोली तालुक्यातील कारापूर सर्वण पंचायतीच्या दोन नंबर प्रभागासाठी तर सालसेतमधील वेळळी पंचायतीच्या चार नंबर प्रभागासाठी त्याचदिवशी मतदार घेतले जाणार आहे.
26 रोजी मतमोजणी पाच पालिकांच्या निवडणुकीसाठी एकूण 231 मतदान केंद्रे असून ती 124 ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहेत. एकूण 1,85,225 मतदार त्यासाठी पात्र आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून मतपत्रिकांच्या माध्यमातून ती निवडणूक होणार आहे. सोमवार दि. 26 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येणार असून दुपारपर्यंत सर्व निकाल हाती येतील, अशी अपेक्षा आहे. कोरोनाचे सर्व नियम, अटी, मार्गदर्शक तत्वे पाळून सदर निवडणूक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.