वार्ताहर / सावळज
डोंगरसोनी (ता. तासगाव) येथे मोटरसायकल अपघातातील जखमीला निवडणुकीचा प्रचार सोडून एका तरुण उमेदवाराने प्रसंगावधान राखून वेळेत दवाखान्यात दाखल केल्याने जखमीच्या जीवावरील संकट टळले. अपघाताच्या संकट काळात मदतीला धावून या उमेदवाराने माणुसकीचे दर्शन घडविल्याने या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथील रहिवाशी ज्ञानदेव कांबळे (वय ६४) हे आज दुचाकीवरून सावळजहून आपल्या तिसंगी या गावाकडे जात होते. मात्र डोंगरसोनी येथे हायस्कूलजवळ असलेल्या धोकादायक गतिरोधकावरून त्यांची गाडी घसरुन अपघात झाला. यामध्ये रस्त्यावर ते जोरात फेकले गेले. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला मोठी दुखापत झाली. अपघातस्थळी तात्काळ डोंगरसोनी हायस्कूलच्या शिक्षकांनी धाव घेत जखमी व्यक्तीची विचारपुस करून आधार दिला.
त्याचवेळी निवडणुकीच्या प्रचारासाठी निघालेले तरूण उमेदवार अमित झांबरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या निवडणुकीचा प्रचार बाजूला ठेवून, जखमी ज्ञानु कांबळे यांना आपल्या गाडीवरुन सावळज येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी त्वरीत दाखल केले व जखमी कांबळे यांच्याबाबत घडलेल्या अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देऊन त्यांना मदतीला बोलावून घेतले. तसेच निवडणुकीच्या प्रचारापेक्षा अपघातग्रस्त व्यक्तीच्या उपचारासाठी वेळ देऊन उपचारानंतर त्यांच्या तब्येतीची चौकशी करून सामाजिक सेवाभाव जपला. अपघातग्रस्त व्यक्तीवर वेळीच उपचार झाल्याने त्यांच्या जिवावर ओढावलेले संकट टळले.
अमित झांबरे यांनी दाखवलेल्या आजच्या प्रसंगावधानामुळे जखमी व्यक्तीच्या जीवावरील धोका टळला. डोंगरसोनी येथे आज घडलेल्या या अपघाताच्या निमित्ताने निश्चितपणाने या तरुणामुळे समाजातील माणुसकीचा झरा जिवंत असल्याचे दिसून आले. मानवता हाच सर्वात मोठा धर्म आहे आणि संकट काळात एकमेकांच्या मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी असल्याची प्रचिती आली आहे.