गुप्तचर यंत्रणांचा इशारा : मोदींना लक्ष्य करण्याचा कट
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिनी संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या कटासंबंधी गुप्तचर यंत्रणांनी सतर्क केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशी अतिथींना लक्ष्य करण्याचा कट दहशतवादी रचत आहेत. प्रजासत्ताक दिनी घातपात घडविण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून सुरू असल्याचे गुप्तचर यंत्रणांकडून म्हटले गेले आहे.
प्रजासत्ताक दिनी मध्य आशियाई देश कजाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझ्बेकिस्तानच्या अध्यक्षांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या नेत्यांना पाकिस्तान-अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटांकडून धोका असल्याचे म्हटले गेले आहे.
मोठय़ा व्यक्तिमत्त्वांना लक्ष्य करणे, जाहीर सभा, महत्त्वपूर्ण ठिकाणी आणि गर्दीयुक्त भागांमध्ये अशांतता पसरविण्याचा कट दहशतवादी संघटना रचत आहेत. यादरम्यान ड्रोनद्वारे देखील हल्ल्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. दहशतवादी हल्ल्याच्या धोक्यामागे लष्कर-ए-तोयबा, द रेजिस्टेंस फोर्स, जैश-ए-मोहम्मद, हरकत-उल-मुजाहिदीन आणि हिज्ब-उल-मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे इनपुटमध्ये म्हटले गेले आहे.
खलिस्तानी सक्रीय
पाकिस्तानात असलेले खलिस्तानी गट देखील पंजाबमध्ये दहशतवाद फैलाविण्यासाठी कॅडर्सना जमवत आहेत. पंजाब आणि अन्य राज्यांमध्ये टार्गेटेड अटॅक करण्याचा कट ते रचत आहेत. खलिस्तानी दहशतवादी गट पंतप्रधानांची बैठक आणि पर्यटनस्थळांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत.
अतिरिक्त सुरक्षा
राजधानीत प्रजासत्ताक दिनापूर्वी गाझीपूरमध्ये आरडीएक्स हस्तगत झाल्यात अतिरिक्त सावधगिरी बाळगली जात आहे. दिल्ली पोलिसांनी राजपथ आणि परिसरातील सुरक्षा मोठय़ा प्रमाणात वाढविली आहे. सुमारे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आली आहे. तसेच फेस रिकग्निशन सिस्टीमही कार्यरत करण्यात आली आहे. या सिस्टीममध्ये 50 हजार संशयित गुन्हेगारांचा डाटाबेस आहे. गाझीपूरमध्ये सापडलेली स्फोटके पाकिस्तानी ड्रोनकडून पंजाब तसेच जम्मू-काश्मीरमध्ये पाडविण्यात आलेल्या खेपचा हिस्सा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.