प्रतिनिधी / कोल्हापूर
71 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा मंगळवार दि. 26 जानेवारीला सकाळी 9.15 वाजता छत्रपती शाहू स्टेडियम येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी दिली. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, सर्व खाते प्रमुख व सर्व नागरिकांना उपस्थित राहता यावे, यासाठी 26 जानेवारीला ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समांरभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.15 वाजता करण्यात यावा. जास्तीत जास्त व्यक्तींना या मुख्य शासकीय समारंभात सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 8.30 ते 10.00 वा च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणत्याही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास किंवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करायचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 पूर्वी किंवा 10 नंतर करावा. ज्या ठिकाणी दरवर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज उभारला जातो, अशा सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी गलांडे यांनी कळविले आहे.