वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदलाच्या पहिल्या महिला लढाऊ वैमानिक फ्लाइट लेफ्टनंट भावना कंठ प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात वायुदलाच्या चित्ररथाचा भाग असणार आहेत. पहिल्यांदाच राजपथावरून राफेल ही लढाऊ विमाने झेपावणार आहेत. एकूण 42 विमाने फ्लायपास्ट करणार असून यात दोन राफेल विमाने सामील आहेत.
भारतीय वायुदलाच्या चित्ररथात लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस, लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, रोहिणी रडार, आकाश क्षेपणास्त्र आणि सुखोई-30 लढाऊ विमान दिसून येणार आहे. बिहारच्या रहिवासी असलेल्या भावना वायुदलाच्या पहिल्या तीन महिला लढाऊ वैमानिकांपैकी एक आहेत. भावना यांनी 2016 मध्ये वायुदलात प्रवेश केला होता. नोव्हेंबर 2017 मध्ये त्या फायटर स्क्वॉड्रनमध्ये सामील झाल्या. मार्च 2018 मध्ये एकटय़ाने मिग-21 बायसनचे उड्डाण केल्यावर लढाऊ वैमानिकाची भूमिका बजावण्यास सज्ज झाल्या होत्या.
गौरवाची बाब भावना कंठ
लहानपणापासूनच प्रजासत्ताक दिन संचलन पाहत आले आहे. या संचलनात सामील होणे माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. सध्या मी मिग-21 बायसनचे सारथ्य करत असून सर्वप्रकारच्या लढाऊ विमानांचे उड्डाण करण्याची इच्छा असल्याचे भावना यांनी म्हटले आहे.
ब्रह्मास्त्र फॉर्मेशन
वायुदलाच्या फ्लायपास्टमध्ये दोन राफेल लढाऊ विमानने असतील. एक राफेल एकलव्य फॉर्मेशनमध्ये दिसून येणार आहे. तर दुसरे राफेल फ्लायपास्टच्या अखेरीस ब्रह्मास्त्र फॉर्मेशन तयार करणार आहे. बहुउद्देशील लढाऊ विमान राफेल भारतीय वायुदलात सप्टेंबर 2020 मध्ये सामील झाले. वायुदलात आतापर्यंत 8 राफेल विमाने सामील झाली आहेत. तर एकूण 36 विमाने खरेदी करण्याचा करार झला आहे. फ्लायपास्टमध्ये सामील होणाऱया 42 विमानांपैकी 15 लढाऊ विमाने, 5 वाहतूक विमाने, 17 हेलिकॉप्टर्स, 1 विंटेज आणि 4 सैन्याची हेलिकॉप्टर्स असतील. प्रजासत्ताक दिनी राजपथावर संचलन करणाऱया वायुदलाच्या पथकात 4 अधिकारी आणि 96 एअरवॉरियर सामील असतील.