5000 सर्वसामान्य लोकांनाच मिळणार प्रवेश : 19 हजार अतिथी असणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
यंदाचे प्रजासत्ताक दिन संचलन दरवर्षीप्रमाणे 10 वाजता सुरू होण्याऐवजी अर्धा तास विलंबाने म्हणजेच 10.30 वाजता सुरू होणार आहे. संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय 26 जानेवारी रोजी दिल्लीत दाट धुके राहणार असल्याच्या पूर्वानुमानामुळे घेतला आहे. सलग दुसऱया वर्षी कुठल्याच विदेशी अतिथीला प्रजासत्ताक दिन संचलनासाठी आमंत्रित करण्यात आलेले नाही. यापूर्वी 5 देशांच्या राष्ट्रप्रमुखांना प्रजासत्ताक दिन संचलनात अतिथी म्हणून आमंत्रित करण्याची तयारी होती.
देशात कोरोना संकट पाहता केवळ 24 हजार लोकांनाच संचलन पाहण्यासाठी राजपथावर येण्याची अनुमती मिळणार आहे. यातील 19 हजार लोक निमंत्रणाच्या माध्यमातून येणारे अतिथी असतील. तर सर्वसामान्य लोकांपैकी केवळ 5 हजार जणांनाच प्रवेश दिला जाईल. या 5 हजार जणांना संचलन पाहण्यासाठी तिकीट खरेदी करावे लागणार आहे. मागील वर्षीदेखील कोरोना महामारीमुळे 25 हजार लोकांनाच राजपथावर प्रवेश देण्यात आला होता. तर 26 जानेवारी 2020 रोजीचे संचलन पाहण्यासाठी राजपथावर सुमारे 1.25 लाख लोक पोहोचले होते.
सलग दुसऱया वर्षी कुठल्याच विदेशी नेत्याला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलेले नाही. कजाकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान आणि उझ्बेकिस्तान या देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्याची योजना होती. परंतु यातील काही देशांमध्ये संकट उभे ठाकल्याने ही योजना टाळण्यात आली.
राजपथावर 10 विशाल आकाराचे एलईडी स्क्रीन बसविण्यात येत आहेत. या स्क्रीन्सवर संचलनाचे थेट प्रसारण केले जाणार आहे. यंदा 75 लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर ट्रडिशनल फ्लाय-पास्टमध्ये सामील होतील. यात राफेल, सुखोई, जग्वार, एमआय-17, सारंग, अपाचे आणि डकोटा सामील आहे. वायुदलाचे वैमानिक संचलनात 15 विविध प्रकारचे फ्लाय-पास्ट फॉर्मेशन्स तयार करतील.