नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोवांलांच्या फोटोवर क्रॉस, फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरू
ऑनलाईन टीम / भोपाळ :
भोपाळमधील भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना एक संशयित पत्र मिळाले आहे. उर्दू भाषेतील या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या फोटोंवर क्रॉस करण्यात आले आहे. तसेच या पत्रासोबत एक पावडरही आहे.
हे संशयित पत्र मिळताच साध्वी यांच्या सहकाऱयांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची पाहणी केल्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. सध्या फॉरेन्सिक टीमकडून प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या घरी पत्राची पाहणी सुरू आहे.
हे पत्र दहशतवाद्यांचे असण्याची शक्यता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्यक्त करत अशा पत्रांना घाबरणार नसल्याचे म्हटले आहे.