वृत्तसंस्था/ लखनौ
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच.एस. प्रणॉयने पुरूष एकेरीची दुसरी फेरी गाठताना युक्रेनच्या बोसनुकचा पराभव केला.
पुरूष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात पाचव्या मानांकित एच.एस. प्रणॉयने केवळ 36 मिनिटाच्या कालावधीत युक्रेनच्या डॅनेलो बोसनुकचा 21-14, 21-18 असा पराभव करत विजयी सलामी दिली. गेल्या आठवडय़ात झालेल्या इंडिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरूष एकेरीचे जेतेपद मिळविणाऱया लक्ष्य सेनकडून प्रणॉयला उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत भारताच्या पी. राजवतला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली असून त्याचा दुसऱया फेरीतील सामना प्रणॉयबरोबर होणार आहे. दुखापतीमुळे भारताच्या समीर वर्माने स्पर्धेतून माघार घेतली. त्याचप्रमाणे भारताच्या शुभंकर डे यानेही दुखापतीमुळे पहिल्या फेरीतील सामना अर्धवट सोडला.
महिलांच्या विभागात भारताच्या अस्मिता चलियाला मालविका बनसूदकडून पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे. दुसऱया एका सामन्यात आकर्षि काश्यपने मुग्घा आगरेचा 21-13, 21-14 असा पराभव केला. अनुपमा उपाध्येने रितुपर्णा दासवर मात केली. आतापर्यंत दोनवेळा ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळविणारी भारताची टॉप सीडेड महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचा सलामीचा सामना बुधवारी तानिया हेमंतशी होणार आहे.