स्पेनमधील बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप : चिनी जोडीला पराभवाचा धक्का
वृत्तसंस्था /माद्रिद
स्पेनमधील हुएल्वा येथे सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एचएस प्रणॉय, अश्विनी पोनप्पा व एन.सिक्की रेड्डी यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
बिगरमानांकित प्रणॉयने मलेशियाच्या डॅरेन ल्यू याचा 21-7, 21-17 असा पराभव करीत आगेकूच केली. त्यानंतर महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांनी चीनच्या 14 व्या मानांकित लियु झुआन झुआन व झिया यु टिंग यांना 21-11, 9-21, 21-13 असा पराभवाचा धक्का देत सनसनाटी निर्माण केली. पुरुष दुहेरीत मात्र एमआर अर्जुन-धुव कपिला यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱया फेरीत त्यांचा ऑल इंग्लंडचे माजी चॅम्पियन व्लादिमिर इव्हानोव्ह व इव्हान सोझोनोव्ह या रशियन जोडीने 21-11, 21-16 असा पराभव केला.
अश्विनी-सिक्की यांनी पहिला गेम जिंकत अपसेट निकालाच्या दिशेने वाटचाल केली. पण दुसऱया गेममध्ये चायनीज जोडीने मुसंडी मारत बरोबरी साधली. मात्र तिसऱया निर्णायक गेममध्ये भारतीय जोडीने वर्चस्व गाजवित चायनीज जोडीचा धक्कादायक पराभव केला. पुढील फेरीत त्यांची लढत सहाव्या मानांकित जाँगकोल्फान किटिथाराकुल-रविंदा प्राजाँगजय (थायलंड) व ऍलिना डॅवलेटोव्हा-एकतेरिना माल्कोव्हा (रशिया) यापैकी एकाशी होणार आहे.
प्रणॉयने पहिल्या सामन्यात हाँगकाँगच्या अँगसला धक्का दिल्याने त्याचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. त्याने डॅरेनविरुद्धही हाच जोम कायम ठेवत विजय मिळविला. प्रणॉयची पुढील लढत डेन्मार्कचा गेम्के किंवा स्पेनचा लुईस एन्रिक पेनाल्व्हर यापैकी एकाशी होईल.