मधुमेहाच्या रुग्णांना कोरोनाची बाधा लवकर होते, असे दिसून आले आहे. त्यामुळे सध्या मधुमेहींची ‘हवा टाईट’ झाली आहे. आपल्या विकारासंबंधी ते अधिक सजगतेने विचार करताना दिसतात. तसेच साखर नियंत्रणाखाली आणण्यासाठी विविध इतर उपायांचा शोधही औषध योजनेबरोबरच घेण्यात त्यांचा पुढाकार दिसून येतो. अशा लोकांसाठी संशोधकांनी सातू या धान्याचा आहारात समावेश करावा, असा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
गहू, तांदूळ, जोंधळे इत्यादी धान्ये आपल्या नित्य परिचयाची आहेत. सातू हे अशाच प्रकारचे एकदल धान्य आहे. तथापि, उत्तर भारतातील एक-दोन राज्ये वगळता सातूचा उपयोग आहारात विशेष केला जात नाही. सातूमध्ये इतर कुठल्याही धान्यापेक्षा अधिक प्रमाणात प्रथिने आहेत. याशिवाय तंतूमय पदार्थ, कॅल्शियम, लोह, मँगेनीज आणि मॅग्नेशियम हे शरीराला अत्यावश्यक असणारे धातूक्षारही यात मोठय़ा प्रमाणात आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी सातू उत्तम उपाय आहे. उष्माघात आणि डिहायडेशन आदी विकारांपासून तो आपल्याला वाचवू शकतो. कोलेस्ट्रॉल रोखण्याचा गुणधर्म त्यात असल्याने मधुमेही रुग्णांसाठी तो विशेष लाभदायक ठरतो, असे संशोधनाअंती दिसून आले आहे.
सातूपासून परोठा, सरबत, कचोरी किंवा लाडू बनविले जाऊ शकतात. इतर धान्यांच्या तुलनेत सातू अधिक स्वादिष्ट असल्याचे अनुभवास येते. सातूपासून केलेल्या पदार्थांमध्ये कांदा, मिरची, खोबरे, जिरेपावडर किंवा शेंगदाणे घालून ते अधिक चविष्ट बनविता येतात. त्यामुळे सातूचा वापर आहारात वाढवावा, असे संशोधकांनी सध्याच्या परिस्थितीत सर्वांना सांगितले आहे.