वार्ताहर/ निपाणी
हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात आजपर्यंत 1 लाख 86 हजार 790 मेट्रीक टन उसाचे गाळप करताना 2 लाख 6 हजार 360 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याकडून नोव्हेंबर 2019 मध्ये गाळप करण्यात आलेल्या उसाला प्रति टन 2700 रुपये प्रमाणे एकरकमी बिल अदा करण्यात येणार आहे. हे बिल येत्या दोन दिवसात शेतकऱयांच्या बँक खात्यावर जमा केले जाईल, अशी माहिती अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सभासदांना वितरीत होणाऱया 2019 सालच्या साखरेचे वितरण 6 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक सभासदाला 50 किलो साखर प्रति किलो 16 रुपये दराने देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सन 2019-20 या गळीत हंगामामध्ये ऊसपुरवठा केलेल्या सभासद व ऊस उत्पादकांना प्रति टन 500 ग्रॅम प्रमाणे 16 रुपये किलो दराने साखर देण्यात येणार आहे. हे वितरण 1 एप्रिलपासून होणार आहे.
खासदार आण्णासाहेब जोल्ले, मंत्री शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना उत्तम पद्धतीने सुरू आहे. सभासद, शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार, ऊसतोड मजूर, कारखान्याचे कर्मचारी यांचे कारखान्याच्या प्रगतीसाठी बहुमोल सहकार्य लाभत आहे. यामुळे चालू हंगामात गतवर्षीपेक्षा अधिक ऊस गाळप करून जास्तीत जास्त साखर उत्पादन करण्यात यश मिळवू, असा विश्वास चंद्रकांत कोठीवाले यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.