सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांचे स्पष्टीकरण : काब्रालसह खंवटे, शिरोडकरांनी घेतला कार्यालयांचा ताबा
प्रतिनिधी /पणजी
रविवारी खातेवाटप झाल्यानंतर काही मंत्र्यांनी काल सोमवारी पर्वरी येथील मंत्रालयात जाऊन आपापल्या कार्यालयाचा ताबा घेतला आणि कामकाजास प्रारंभ केला. सध्या तरी 24ƒ7 अशी पाण्याची सोय शक्य नाही असे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी स्पष्ट केले असून प्रतिदिन 4 ते 5 तास पाणी प्रत्येक घरात मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक व्यक्तीला 150 ते 200 लिटर पाणी तरी मिळाले पाहिजे आणि तेवढे आवश्यक आहे. 24 तास पाणी देणे सध्या तरी अशक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोव्यात बेकायदा घरे बांधून सार्वजनिक आरोग्याचे प्रमाणपत्र घेऊन पाणी जोडणी दिली जाते. त्याला कुठेतरी आळा घालण्याची गरज आहे. त्यात लक्ष घालणार असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे बोलणार असल्याचे ते म्हणाले.
अभ्यास करुन पावले उचलणार : खंवटे
पर्यटनमंत्री रोहन खंवटे व जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी देखील कार्यालयाचा ताबा घेऊन काम सुरु केले. खंवटे म्हणाले की, ‘शो मस्ट गो ऑन’ हा शो आता संपला असून पर्यटनासाठी नवीन शो सुरु करायचा आहे. खात्यांचा अभ्यास करुन त्यानंतरच योग्य ती पावले उचलणार व उपाययोजना करणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.
आपणच शिक्षण खाते घेतले नाही : शिरोडकर
शिरोडकर यांनी सांगितले की, शिक्षण खाते मिळणार अशी हितचिंतकांची अपेक्षा होती. तथापि, इतर क्षेत्रात काम करण्यासाठी आपण ते खाते घेतले नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. गोव्यातील पाणी प्रश्न व जलप्रकल्पांचे प्रश्न यांचा अभ्यास करुन ते सर्व प्राधान्य क्रमाने सोडवणार आहे. म्हादईप्रश्नी पुन्हा एकदा अभ्यास करावा लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले.