नाटय़मय घडामोडीत काँग्रेसला ठोकला रामराम : नावेली निवडणूक पराभवानंतरच्या वादाचा परिणाम
प्रतिनिधी / पणजी
गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो यांनी एका महत्त्वपूर्ण घडामोडीत काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आणि त्यांनी आमआदमी पक्षात प्रवेश केला.
जिल्हा पंचायत पोट निवडणुकीत दक्षिण गोव्याच्या नावेली मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणाऱया प्रतिमा कुतिन्हो यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमधील काही नेत्यांमुळे आपला पराभव झाला, असे जाहीर केले होते. त्यानंतर स्थानिक आमदार लुईझिन फालेरो आणि प्रतिमा कुतिन्हो यांच्या दरम्यान बऱयाच प्रमाणात शाब्दिक चकमकी उडाल्या. पराभवानंतर प्रतिमा कुतिन्हो यांना काँग्रेसच्या नेत्यांनी सहानुभूती दाखविण्याऐवजी त्यांच्यावर टीकाच सुरु केल्यानंतर प्रतिमा कुतिन्हो यांनी त्यांच्या निषेधार्ह काँग्रेस पक्षाचा त्याग करण्याचे ठरविले. कुतिन्हो यांच्या पराभवानंतर कुतिन्हो यांना आमआदमी पार्टीच्या नेत्यांनी पूर्ण सहानुभूती दाखविली आणि त्यांना नवी दिल्लीत येण्याचे निमंत्रण दिले.
कुतिन्हो यांनी काल शुक्रवारी सकाळी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना पाठवून दिला आणि त्या दिल्लीला रवाना झाल्या. नवी दिल्लीत त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी 3 वा. दिल्लीत एका पत्रकार परिषदेतून त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाला जनहितापासून दूर नेणे चालू केल्यानेच आपण पक्षाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले.
प्रतिमा कुतिन्हो या सुरुवातीपासून काँग्रेस पक्षात होत्या. युवक काँग्रेसचे नेतृत्व देखील यापूर्वी त्यांनी केलेले आहे व भावी आमदार म्हणून त्यांना ओळखले जायचे. नावेली जि. पं. निवडणुकीत उतरवून त्यांना राजकारणातून संपविण्याचा कट काँग्रेस नेत्यांनी आखला असे त्यांचे म्हणणे होते.
आम आदमीला मिळाला नेता! काँग्रेस पक्षात प्रतिमा कुतिन्हो यांचा एक दबदबा होता. गेली अनेक वर्षे भाजप सरकार विरुद्ध अनेक उपक्रमांद्वारे सरकारला सळो की पळो करणाऱया या युवा नेत्याने पक्षाला रामराम ठोकल्यानंतर आमआदमी पक्षाला आता खऱया अर्थाने नेता सापडला आहे. एवढे दिवस पक्षाकडे कार्यक्षम नेते नव्हते. त्यामुळे प्रतिमा कुतिन्हो या आप पक्षाला जास्तीत जास्त लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने काम करतील, असा अंदाज आहे.