प्रतिनिधी/ मडगाव
हिन्दुच्या धार्मीक भावना दुखावल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो याच्याविरुद्ध मडगावच्या न्यायालयात सोमवारी फातोर्डा पोलिसांनी आरोपपत्र सादर केले आहे.
इंधन दरवाढ प्रश्नावरुन गोवा प्रदेश महिला काँग्रेस संघटनेने मडगावच्या जिल्हाधिकाऱयांच्या कार्यालयाजवळ 1 जुलै 2020 रोजी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमाराला निदर्शने केली होती. दुचाकी चालविण्यासाठी पेट्रोलची गरज असते. पेट्रोल महागल्यामुळे दुचाकी चालविणे कठीण झाल्याचे पाहून या संघटनेने दुचाकी वाहनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पेट्रोल दरवाढीचा निषेध केला होता.
या प्रतिकात्मक अंत्ययात्रेच्यावेळी ‘राम नाम सत्य है’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या आणि हिन्दुंच्या धार्मीक भावना दुखावल्याचे तक्रारदाराने पोलीस तक्रारीत म्हटले आहेत. 15 पानांच्या या आरोपपत्रात एकूण 7 साक्षीदारांची नावे आहेत. अंकीत साळगावकर यांनी या प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार केली होती.
जाणून बुजून कोणीही कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्यास त्याला 4 वर्षापर्यंतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावण्याचा अधिकार भारतीय दंड संहितेच्या 295 -अ कलमाखाली आहे.
जो कोणी धार्मीक भावना दुखावण्याच्या उद्देशाने काही शब्द प्रयोग करतो किंवा विक्षिप्त आवाज काढतो त्याला भारतीय दंड संहितेच्या 298 कलमाखाली एक वर्षाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्याची कायद्यात तरतूद आहे.
प्रस्तूत प्रकरणातील संशयित आरोपी प्रतिमा कुतिन्हो हिच्याविरुद्ध फातोर्डा पोलिसांनी वरील दोन्ही कलमाखाली आरोपपत्र सादर केले आहे. आरोपपत्रातील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास संशयित आरोपीला वरीलप्रमाणे शिक्षा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.