केवळ काबूलमध्ये कामावर परतल्या महिला, उर्वरित प्रांतांमधील दहशत कायम
घरातून बाहेर पडणेही ठरले अवघड
तालिबान जागतिक दबावामुळे स्वतःची प्रतिमा बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तालिबानने काबूलमध्ये महिलांना कामावर तसेच बाजारपेठेत जाण्याची सूट दिली आहे. पण हा प्रकार केवळ जगाला दाखविण्यासाठी आहे. उर्वरित प्रांतामध्ये असे चित्र नाही. तेथील महिला दहशतीमुळे घराबाहेर देखील पडू शकलेल्या नाहीत. काबूलमधील बाजारपेठ हळूहळू पुन्हा सुरू होत असल्याचे बुधवारी दिसून आले. पण तेथील ब्युटी पार्लर बंद आहेत. शहराच्या काही हिस्स्यांमध्ये तालिबानी दहशतवादी वाहनांमधून गस्त घालत आहेत.
तर तालिबानी दहशतवादी स्वतःची बाईक किंवा पिक-अप कारमधून आरोळय़ा देताना दिसून येतात. या वाहनांवर तालिबानचे ध्वज लावलेले आहेत. तालिबानने काही ठिकाणी तात्पुरत्या चौक्याही उभारल्या आहेत. तर देशातील तरुणाई उज्ज्वल भविष्यासाठी विदेशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
आरोग्य विभाग आणि रुग्णालयांमध्ये महिला कर्मचारी, डॉक्टर आणि नर्स कामावर परतल्या आहेत. महिला देखील खरेदी करताना दिसून आल्याची माहिती स्थानिक पत्रका इस्माइल एंडलीप यांनी दिली आहे. लोकांना लक्ष्य करणार नसल्याचे तसेच महिला कुठल्याही भीतीशिवाय काम करू शकतात अशी घोषणा तालिबानने केली होती.
तालिबानची प्रतीक्षा करतेय
अफगाणिस्तानमधील पहिली महिला महापौर जरीफा गाफरी यांनी तालिबानला आव्हान दिले आहे. तालिबानने यावे आणि मला आणि माझ्यासारख्या अन्य लोकांना मारून टाकावे याची मी प्रतीक्षा करत असल्याचे जरीफा यांनी म्हटले आहे. अध्यक्ष अशरफ गनी यांच्या पलायनावर 27 वर्षीय जरीफाने संताप व्यक्त केला आहे. मी कुठे जाऊ? कुटुंब आणि पतीसोबत येथेच असून मदत करणारा कुणीच नसल्याचे ती म्हणाली. जरीफा 2018 मध्ये अफगाणिस्तानच्या मैदान वारदकची महापौर म्हणून निवडून आली होती. जरीफाला यापूर्वी देखील तालिबानकडून हत्येची धमकी मिळाली आहे. तसेच तिच्यावर तीनवेळा हल्ला झाला आहे.