`सीपीआर’मध्ये ऑक्सिजन कॉन्सट्रेटर दाखल,
कृष्णात पुरेकर/कोल्हापूर
सीपीआर हॉस्पिटलमध्ये प्रतिमिनिट हवेतून 1 हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती करणारी यंत्रणा दाखल झाली आहे. या 1 कोटीच्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरसाठी 25 लाखांचे शेड उभारले आहे. पीएम केअर निधीतून मिळालेला हा कॉन्सट्रेटर डीआरडीओद्वारे लवकरच येथे उभारला जाणार आहे. याचे डिझाईन डीआरडीओने बनवले असले तरी त्याची निर्मिती टाटा ऍडव्हान्सने केली आहे.
येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संचलित सीपीआर हॉस्पिटल कोरोना आयसोलेटेड आहे. साडेसहाशे बेडच्या या हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात ऑक्सिजनची उणीव जाणवली. त्यातूनच गतवर्षी 20 हजार लिटर्सचा ऑक्सिजन टँक येथे उभारला. त्यामुळे कोरोना रूग्णांना जीवदान मिळाले. शेंडा पार्क येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 6 हजार लिटर्सचा ऑक्सिजन टँक उभारला. काही महिन्यांपुर्वी हा टँकही `सीपीआर’मधील पुनर्स्थापित केला आहे. या दोन्ही टँकमुळे येथे 26 हजार लिटर्सचा ऑक्सिजन रूग्णांसाठी उपलब्ध झाला आहे.
भंडारा येथील ऑक्सिजन गळती प्रकरणानंतर ऑक्सिजन कॉन्सटेटरची संकल्पना पुढे आली. त्यातूनच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरच्या प्रस्तावाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली. केंद्राच्या पीएम केअर निधीतून त्याची उभारणी होणार आहे. डीआरडीओने त्याचा आराखडा बनवला आहे. टाटा ऍडव्हान्स कंपनीची ही निर्मिती आहे. सीपीआरमध्ये पीएम केअर अंतर्गत ऑक्सिजन कॉन्सट्रेटर यंत्रणा दाखल झाली आहे. डीआरडीओच्या तंत्रज्ञाचे पथक उभारणीसाठी कोल्हापुरात दाखल झाले आहे.
सीपीआरमध्ये हायरिस्क रूग्णांसाठी दोन टँकद्वारे 26 हजर लिटर ऑक्सिजन उपलब्ध आहे. लिक्विड ऑक्सिजनचा नियमित पुरवठा येथे आवश्यक बनला आहे. पण आता प्रतिमिनिट 1 हजार लिटर्स ऑक्सिजन निर्मितीचा कॉन्सट्रेटर येथे उभारला जात आहे. याद्वारे हवेतील ऑक्सिजन घेऊन तो रूग्णांना दिला जाणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनसाठी सीपीआर आता स्वयंपुर्ण बनणार आहे.
6 लिटर्सपेक्षा कमी गरज असलेल्या रूग्णांसाठी वापर ः डॉ.एस. एस. मोरे
अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे म्हणाले, सीपीआरमध्ये प्रसुती वॉर्डमागे ऑक्सिजन कॉन्सट्रेटरसाठी शेड उभारले आहे. येथे ऑक्सिजन कॉन्सट्रेटरद्वारे हवेतून प्रति मिनिट 1 हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. त्याचा वापर 6 लिटर्सपर्यत ऑक्सिजनची गरज असलेल्या रूग्णांना होणार आहे. त्यापेक्षा अधिक गरज असलेल्यांसाठी टँकमधील ऑक्सिजन वापरला जाणार आहे.
`डीआरडीओ’ची डिझाईन, उभारणीची जबाबदारी नॅशनल हायवेची
`राष्ट्रीय महामार्ग’चे जिल्हा व्यवस्थापक चंदकांत भारडे म्हणाले, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरला मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या आराखडÎाद्वारे त्यासाठी 25 लाखांचे शेड सीपीआरमध्ये उभारले आहे. सुमारे 1 कोटीचा हा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर आहे. प्रतिमिनिट 1 हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती याद्वारे होणार आहे. याची डिझाईन `डीआरडीओ’ने बनवली आहे. त्यासाठी प्रेशर ऍडस्पोर्शन, स्विंग ऍडस्पोर्शन टेक्नॉलाजी वापरली आहे. टाटा अँडव्हॉन्सने त्याची निर्मिती केली आहे. उभारणीची जबाबदारी नॅशनल हायवेवर असल्याचे त्यांनी सांगितले.