बर्मिंगहम / वृत्तसंस्था
प्रतिष्ठेची ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा आजपासून (बुधवार दि. 17) खेळवली जाणार असून वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधू त्यात भारतीय चमूचे नेतृत्व साकारेल. यापूर्वी स्विस ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये सिंधूला कॅरोलिना मारिनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची काही प्रमाणात भरपाई करण्यासाठी सिंधूला येथे उत्तम संधी असेल. कॅरोलिना मारिनने या स्पर्धेतून माघार घेतली असून यामुळे यातील काही रंगत कमी झाल्यास आश्चर्याचे कारण असणार नाही.
कॅरोलिना मारिनप्रमाणेच कोरिया व चायनीज तैपेईचे देखील काही अव्वल बॅडमिंटनपटू या स्पर्धेत खेळणार नाहीत. ही स्पर्धा टोकियो ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेचा भाग नसल्याने या स्पर्धेकडे या खेळाडूंनी काही प्रमाणात पाठ फिरवली.
भारतीय पथकात 13 सदस्य
यंदाच्या या ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारताच्या पथकात 13 सदस्यांचा समावेश असून येथील जेतेपदाचा दुष्काळ यंदा तरी संपुष्टात आणण्याची भारताकडे निश्चितच संधी असेल. यापूर्वी, ही प्रतिष्ठेची स्पर्धा महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण (1980) व पी. गोपीचंद (2001) या दोघाच भारतीयांना जिंकता आलेली आहे.
माजी अव्वलमानांकित सायना नेहवाल 2015 मध्ये उपजेतेपदापर्यंत पोहोचली तर पीव्ही सिंधूने 2018 मध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली, ही त्यानंतरची भारतीय संघातर्फे झालेली उत्तम कामगिरी आहे. ऑलिम्पिक रौप्यजेती सिंधू यंदा आणखी एकदा पदकाची प्रबळ दावेदार असेल. मात्र, सायना नेहवाल मागील दोन वर्षात येथे दोनच वेळा उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलेली असून तिच्यासमोर अधिक कडवे आव्हान असेल.
अन्य भारतीय खेळाडूंमध्ये माजी अव्वलमानांकित किदाम्बी श्रीकांत, युवा जोडी सात्विकराज रणकिरेड्डी-चिराग शेट्टी यांनी अलीकडेच स्विस ओपन स्पर्धा गाजवली असून येथे तोच कित्ता आणखी एकदा गिरवण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.
सिंधूची लढत शियाहविरुद्ध
पाचवी मानांकित सिंधूची सलामी लढत मलेशियाच्या सोनिया शियाहविरुद्ध होणार असून या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिला जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध सामोरे जावे लागेल, असे चित्र आहे. लंडन ऑलिम्पिक कांस्यविजेती सायनाची पहिली लढत डेन्मार्कच्या बहरातील सातव्या मानांकित मिया ब्लिचफेल्डविरुद्ध होणार आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिप कांस्यजेता बी. साईप्रणितचा सामना फ्रान्सच्या तोमा ज्युनियर पोपोव्हविरुद्ध होणार असून विजय मिळविल्यास दुसऱया फेरीत त्याची व्हिक्टर ऍक्सेल्सनविरुद्ध लढत होईल. व्हिक्टरने अलीकडेच थायलंड सुपर 100 व स्विस ओपन अशा दोन स्पर्धा जिंकल्या आहेत.
केन्टोचे अपघातानंतर पुनरागमन
राष्ट्रकुल सुवर्णजेत्या पारुपल्ली कश्यपची मोहीम जपानच्या जागतिक अव्वलमानांकित केन्टो मोमोटोविरुद्ध सुरु होईल. गतवर्षी भीषण कार अपघातात जखमी झालेल्या केन्टोसाठी पुनरागमन करताना ही पहिलीच स्पर्धा असेल. त्या भीषण अपघातानंतर केन्टोला डोळय़ाची शस्त्रक्रिया करवून घ्यावी लागली होती. नंतर अगदी त्याला कोरोनाचा प्रादुर्भावही झाला होता.
अन्य लढतीत एचएस प्रणॉय मलेशियाच्या डॅरेन ल्यूविरुद्ध लढणार आहे तर समीर वर्मासमोर ब्राझीलच्या कोएल्होचे आव्हान असेल. युवा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन थायलंडच्या वँगशोरेनला सामोरे जाईल. पुरुष दुहेरीत सात्विक-चिरागसमोर फ्रान्सच्या ज्युलियन-ऍडम तर मिश्र दुहेरीत सात्विक-अश्विनी यांच्यासमोर जपानच्या युकी-मिसाकी यांचे आव्हान असणार आहे.