लंडन
फरार उद्योजक विजय मल्ल्या यांनी ब्रिटनमध्ये वास्तव्य करू देण्याची अनुमती मिळावी याकरता तेथील गृहमंत्री प्रीति पटेल यांच्याकडे अर्ज केला आहे. लंडनच्या उच्च न्यायालयात मल्ल्या यांच्या दिवाळखोरी संबंधी सुनावणी सुरू आहे. मल्ल्या सध्या जामिनावर बाहेर आहेत .
भारत सरकार 65 वर्षीय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे. सरकारी बँकांकडून कर्ज घेत 9 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप मल्ल्यांवर आहे. प्रत्यार्पणापासून वाचण्यासाठी मल्ल्या यांच्याकडे आता ब्रिटनच्या गृहमंत्र्यांकडे अर्ज करण्याव्यतिरिक्त कुठलाच पर्याय नव्हता.
मल्ल्यांनी दैनंदिन खर्चांसाटी स्वतःच्या मालकीच्या मालमत्तेच्या विक्रीतून मिळालेली रक्कम मागितली आहे. ही मालमत्ता प्रेंच रिवेरापासून दूर अंतरावरील एका बेटावर आहे. याची किंमत सुमारे 30 कोटी रुपये आहे. ही रक्कम कोर्ट फंड्स ऑफिसकडे जमा आहे.
राजकीय आश्रयाची मागणी
मल्ल्यांनी ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात भारतात होणाऱया प्रत्यार्पणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळण्यात आली आहे. गृहमंत्री पटेल यांनी प्रत्यार्पणाच्या दस्तऐवजावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. तांत्रिक कारणास्तव स्वाक्षरीला विलंब होत असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून संगण्यात आले आहे. मल्ल्यांनी मानवाधिकारांचा दाखला देत ब्रिटनकडून राजकीय आश्रय मागितल्याचे समजते.