युनिक हेल्थ आयडी : नरेंद्र मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवडय़ात एक मोठी योजना सुरू करणार आहेत. या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक भारतीयाला युनिक हेल्थ आयडी (आरोग्य ओळखपत्र) मिळणार आहे. पंतप्रधान मोदी 27 सप्टेंबर रोजी डिजिटल हेल्थ मिशनचा शुभारंभ करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिलीआहे.
युनिक हेल्थ आयडीमध्ये संबंधित व्यक्तीच्या आरोग्याचा पूर्ण तपशील नोंद असणार आहे. युनिक आयडी लोकांचे आधारकार्ड आणि मोबाइल क्रमांकाच्या मदतीने तयार होणार आहे. पीएच-डीएचएमचा मुख्य उद्देश भारताची आरोग्य सेवा प्रणाली अधिक उत्तम करणे आहे. हेल्थकेयरच्या गरजांचे वन-स्टॉप सोल्युशन निर्माण करण्याची ही तयारी आहे. यामुळे आरोग्य सेवा देणाऱया संस्थांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे ठरणार असून त्यांचे उत्तरदायित्व देखील वाढणार आहे.
युनिक आयडीचे स्वरुप
युनिक हेल्थ आयडी एक 14 अंकांचा रँडम पद्धतीने प्राप्त क्रमांक असणार आहे. याच्या मदतीने व्यक्तीचा आरोग्य विषयक तपशील नोंद ठेवला जाऊ शकतो. याकरता आधारकार्ड अनिवार्य नसून केवळ मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातूनही युनिक आयडी तयार करता येणार आहे. आधार केवळ अशाच ठिकाणी लिंक करणे आवश्यक आहे जेथे थेट लाभ हस्तांतरणाची प्रक्रिया होते. याचा वापर अन्य कुठेच करता येत नसल्याचे स्पष्टीकरण मंत्रालयाने पूर्वीच दिले आहे. पंतप्रधान डिजिटल हेल्थ मिशन या योजनेला पूर्वी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन म्हटले जात होते.
प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी
डिजिटल हेल्थ मिशन सध्या प्रायोगिक तत्वावर राबविली जात आहे. या अंतर्गत केंद्रशासित प्रदेश अंदमान आणि निकोबार बेटसमूह, चंदीगड, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, लडाख, लक्षद्वीप तसेच पुड्डुचेरीत आकडेवारी जमविली जात आहे. एनडीएचएमच्या संकेतस्थळावर सध्या हेल्थ आयडी तयार करण्याचा पर्याय दिसून येतो, पण हा पर्याय सध्या केवळ केंद्रशासित प्रदेशांसाठीच उपलब्ध आहे.