वार्ताहर /हिंडलगा
गोजगे येथील शिवारात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला असून डिझेल इंजीन चोरी करण्याच्या घटनांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत आहे. शनिवार दि. 25 रोजी एकाच रात्री पुन्हा प्रत्येकी सुमारे अडीच लाख रुपये किमतीच्या दोन डिझेल इंजीनची चोरी करण्यात आली आहे. त्यामुळे दोघा शेतकऱयांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत काकती पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गोजगे येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश कल्लाप्पा होनगेकर व शंकर गुंडू होनगेकर यांच्या गावाजवळील शिवारात 15 एचपी क्षमतेचे पाणी खेचण्याचे दोन डिझेल इंजीन होते. याचा वापर ते घाण्यासाठी व पिकाला पाणी पाजण्यासाठी करत होते. सदर इंजीनची किंमत सध्या बाजारभावानुसार अडीच ते तीन लाख रुपये असून एक टनाहून अधिक वजन होते. तरी देखील शनिवारी रात्री अज्ञात चोरटय़ांनी दोन्ही इंजीन चोरून नेले आहेत. रविवारी सकाळी शिवारात गेल्यानंतर प्रकाश होनगेकर व शंकर होनगेकर यांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यामुळे शेतकऱयांना मोठा फटका बसल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित काकती पोलीस स्थानकात धाव घेऊन चोरटय़ांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. यापूर्वी देखील अनेक ठिकाणच्या शिवारात लहान-मोठय़ा चोरीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये विद्युत मोटारीबरोबरच शिवारात काढून ठेवलेल्या पिकांची देखील चोरी झाल्याचा समावेश आहे. याचा फटका वर्षभर काबाडकष्ट करून पीक घेणाऱया शेतकऱयांना बसत आहे. पण अद्यापही चोरटय़ांचा शोध काही लागला नाही. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून चोरटय़ांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
जुगारी, गावठी दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
गोजगे, मण्णूर आणि आंबेवाडी परिसरातील शिवारामध्ये गेल्या काही महिन्यांपासून राजरोसपणे जुगार खेळणे आणि गावठी दारू विक्री करण्याचे प्रमाण वाढले आहे. जुगारी दैनंदिन जागेमध्ये बदल करून अड्डे चालवत आहेत. गावठी दारू विक्रेत्याने गोजगे आणि मण्णूर गावच्या हद्दीजवळ असलेल्या एका उसाच्या मळय़ात चक्क तंबू ठोकून खुलेआम दारुची विक्री सुरू केली आहे. त्यामुळे आसपासच्या गावातील तळीरामांची याठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. याचा शिवारात काम करणाऱया महिलांसह शेतकरीवर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी जुगारी आणि गावठी दारू विपेत्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनदेखील पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने यात गुंतलेल्या व्यक्तींचे फावले आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन येथे सुरू असलेल्या गैरधंद्याना चाप लावण्याची मागणी होत आहे.