अमेरिकेतील अजब गाव
घरातल्या सदस्यांकडे दुचाकी किंवा कार असणे आता सामान्य बाब आहे, पण तुम्ही कधी अशा वस्ती/गावाबद्दल ऐकले आहे, का जेथील प्रत्येक घराच्या गॅरेजमध्ये कारच नव्हे तर एक विमानही उभे केले जाते. ही तुम्हाला थट्टा वाटत असल्यास तुम्हाला अमेरिकेच्या रेसिडेन्शियल एअरपार्क भागाबद्दल माहिती नसावी. या भागातील प्रत्येक घराकडे स्वतःचे असे विमान आहे.
दुसऱया महायुद्धात अमेरिकेत निर्णायक भूमिका बजावली होती. अमेरिकेत 1939 पर्यंत 34,000 वैमानिक होते. पण 1946 पर्यंत हा आकडा वाढून 4 लाखांपेक्षाही अधिक झाला होता.
फ्लाय-इन-कम्युनिटीज
महायुद्ध संपल्यावर अनेक धावपट्टय़ा मोकळय़ा झाल्या आणि वैमानिकांना काम उरले नाही. या स्थितीला तोंड देण्यासाठी अमेरिकेच्या द सिव्हिल एअरोनॉटिक्स ऍडमिनिस्ट्रेशनने एअरपार्क निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला, यांतर्गत बंद पडलेल्या धावपट्टय़ांच्या क्षेत्रात निवृत्त सैन्य वैमानिकांना वसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा वस्त्यांना ‘फ्लाय-इन-कम्युनिटीज म्हटले जाते. येथील प्रत्येक घरात कारप्रमाणेच एक विमान असते.
अत्यंत रुंद रस्ते
या वस्त्यांमधील रस्ते एक विमान आणि कार परस्परांना न धडकता एकमेकांना ओलांडू शकतील इतपत रुंद असतात. जगात 630 पेक्षा अधिक आवासीय एअरपार्क्स असून यातील 610 पेक्षा अधिक अमेरिकेत आहेत.
पहिले एअरपार्क
कॅलिफोर्निया येथील कॅमेरून पार्क विमानतळ याच आवासीय एअरपार्क्सपैकी आहे. अलिकडेच दसोलफॅमिल नावाच्या टिकटॉक युजरने या भागावर आधारित एक चित्रफित तयार केली असून यात प्रत्येक घराच्या गॅरेजमध्ये कारऐवजी एक विमान उभे असल्याचे दिसून येऊ शकते. कॅलिफोर्नियाच्या प्रेस्नो येथील सिरेरा पार्क पहिला एअर पार्क होता, ज्याची निर्मिती 1946 मध्ये करण्यात आली होती.