आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
घरात असणाऱयांना हेल्पडेस्कची सुविधा द्या, त्याठिकाणी राहूनच उपचार घेण्याबाबत माहिती देण्यासाठी टेलिकॉलिंग व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येईल. इस्राएलकडून पोर्टेबल ऑक्सिजन उपकरणे मागविली जात असून सौम्य लक्षणे असणाऱया बाधितांसाठी पोर्टेबल ऑक्सिजन पुरविले जाणार आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हय़ाला 1 हजार, शहरकक्षेत 5 हजार पोर्टेबल व्हेंटिलेटरची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. बेंगळुरात पत्रकारांशी ते बोलत होते.
मंत्री सुधाकर पुढे म्हणाले, राज्यात सध्या 300 टन ऑक्सिजन निर्माण करण्याची क्षमता आहे. शनिवारी केंद्राकडून 800 टन ऑक्सिजन कर्नाटकासाठी पाठवून देण्यात आला आहे. तसेच राज्यात सध्या ऑक्सिजनची कमतरता नाही. शनिवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासमवेत बैठक झाली असून गृहमंत्री, महसूलमंत्री, केंद्रीय मंत्री सदानंदगौडा, प्रल्हाद जोशी यात सहभागी झाले होते. दरम्यान, याबाबत चर्चा करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
बेंगळुरातील व्हिक्टोरिया कॅम्पसमध्ये मेकशिफ्ट रुग्णालय स्थापण्याचा विचार सुरू आहे. राज्यात व्हेंटिलेटर रुग्णालयांची कमतरता असून याबाबतही बैठकीत चर्चा झाली आहे. खासगी रुग्णालयातील 75 टक्के बेड कोविड रुग्णांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना मेकशिफ्ट रुग्णालय करण्यासह सर्व जिल्हय़ात 100 ते 150 बेड्सचे मेकशिफ्ट रुग्णालय स्थापण्यात येणार आहे. बिदर, शिमोगा, म्हैसूर, तुमकूरसह अनेक जिल्हय़ात मॉडय़ूलर अतिदक्षता विभाग सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असेही मंत्री सुधाकर म्हणाले.
खासगी मेडिकल कॉलेज रुग्णालयांना 75 टक्के बेड्स देण्याचा आदेश
राज्यातील खासगी मेडिकल कॉलेज रुग्णालयांनी 75 टक्के बेड्स कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी द्यावेत, असा आदेश राज्य सरकारने दिला आहे. त्यानुसार 71,400 बेड्स बाधितांच्या उपचारासाठी उपलब्ध होणार आहेत. खासगी रुग्णालयात कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असून सरकारच्या नियमानुसार कोरोनाबाधितांवर उपचार करावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केले. रविवारी त्यांनी बेंगळुरातील व्हिक्टोरिया रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.