मंत्री मुरुगेश निराणी यांची माहिती : म्हैसूर येथे पत्रकारांशी संवाद
प्रतिनिधी / बेंगळूर
भविष्यातील संकटांवर मात करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन जनरेटर स्थापण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती मंत्री मुरुगेश निराणी यांनी दिली. म्हैसूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खाण आणि भूविज्ञान खात्याच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
मंत्री निराणी पुढे म्हणाले, तालुकास्तरीय ऑक्सिजन जनरेटर स्थापल्यास कोठेही ऑक्सिजनची समस्या निर्माण होणार नाही. नूतन नर्सिंग कॉलेज न स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आता पारिचारिकांची कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे नूतन नर्सिंग कॉलेज स्थापण्यासाठी शैक्षणिक संस्था पुढे आल्यास त्याला मान्यता दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
ऑक्सिजनविषयी बोलताना ते म्हणाले, राज्यात ऑक्सिजनची कमतरता नाही. आपल्याकडे भरपूर ऑक्सिजन आहे. परंतु, ते साठविण्यासाठी कंटेनरची कमतरता आहे. राज्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन तयार होत असून केंद्राकडूनही ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. मात्र, सिलिंडरचा अभाव असल्याने समस्या होत आहे. कोरोना काळात काम करणाऱयांना ग्रेस मार्क दिले जातील. सध्या ऑक्सिजनची मागणी कमी झाली आहे. जिल्हा प्रशासन आणि सरकार प्रवाभीपणे कोरोना आव्हानाकडे लक्ष देत असल्याबद्दल मंत्री निराणी यांनी कौतुक केले.
स्थानिकांना दुचाकी, बैलगाडीतून वाळू वाहतुकीला परवानगी
राज्यात नवे वाळू धोरण जारी करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. दुचाकी, बैलगाडीतून शेतकऱयांना व स्थानिकांना वाळू वाहतूक करण्यास परवानगी आहे. त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई न करण्याची सूचना पोलीस खात्याला केली आहे. वाळू माफियांवर आळा घालण्यासाठी लवकरच कठोर वाळू धोरण जारी करण्यात येईल, असेही मंत्री निराणी म्हणाले.