बेळगाव/प्रतिनिधी
प्रत्येकाने एक उच्च ध्येय ठेवले पाहिजे. ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे ते क्षेत्र निवडले पाहिजे. पालकांनी मुलांवर आपला निर्णय लादू नये. मुलांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रात मुलांना संधी उपलब्ध करून द्या. मराठा मंदिरच्यावतीने विद्यार्थ्यांचा सत्कार हाच मराठा मंदिराचा सत्कार आहे, असे उद्गार प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांनी काढले. मराठा मंदिरतर्फे दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव समारंभामध्ये ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.
यावेळी मराठा मंदिरतर्फे 2019-20 या शैक्षणिक वर्षामध्ये दहावी परीक्षेत मराठी माध्यमातून 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राणी चन्नम्मा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. विनोद गायकवाड उपस्थित होते. व्यासपीठावर मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, बाळासाहेब काकतकर, मेघनाथ कंग्राळकर, चंद्रकांत घोरपडे, विश्वास घोरपडे, लक्ष्मणराव होनगेकर, चंद्रकांत गुंडकल, नेताजी जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वागतपर भाषणामध्ये बाळासाहेब काकतकर म्हणाले, विद्यार्थ्यांना उत्तेजन, प्रोत्साहन देण्यासाठी मराठा मंदिर सदैव तत्पर आहे. गरजूंना उत्तेजन देऊन त्यांना पुढील भविष्यासाठी उभे करण्यास प्रोत्साहन देण्यास मराठा मंदिर नेहमीच आग्रही असेल, असे ते म्हणाले. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर सर्व गुणी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी सर्वांनी सामाजिक अंतर पाळून मास्कसह या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होता. सूत्रसंचालन एकनाथ पाटील यांनी केले. नेमिनाथ कंग्राळकर यांनी आभार मानले.