प्रतिनिधी /बेळगाव
गणेशपूर गल्ली शहापूर येथील प्रथमेश पाटील यांना रक्षा राज्यमंत्री पदकाने सन्मानित करण्यात आले. प्रथमेश यांनी दाखविलेल्या साहसाबद्दल त्यांना हे पदक देण्यात आले. एनसीसीच्या माध्यमातून प्रथमेश यांनी सामाजिक कार्यात भाग घेतल्याने त्यांना यापूर्वी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डिसेंबर 2020 मध्ये रक्षा राज्यमंत्री पदक प्रथमेश यांना जाहीर झाले होते. परंतु तत्कालिन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा अपघात झाल्यामुळे पदकाचे वितरण झाले नव्हते. अखेर डिसेंबर 2021 मध्ये एनसीसीचे कर्नल राजीव खजुरिया, ग्रुप कमांडर के. श्रीनिवास, कर्नल आदित्यकुमार वर्मा यांच्या हस्ते त्यांना पदक देण्यात आले. केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक यांनी प्रथमेश यांना गोवा येथे बोलावून त्यांचा नुकताच सन्मान केला. प्रथमेश पाटील हे तरुण भारत ट्रस्टच्या ज्ञान प्रबोधन स्कूल व जीएसएस-आरपीडी कॉलेजचे विद्यार्थी आहेत. यापूर्वी त्यांना महानिर्देशक पदक व मुख्यमंत्री गौरव पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.