दोन्हींचे निर्देशांक प्रभावीत- एचसीएल टेक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील शुक्रवारी भारतीय भांडवली बाजार आणि राष्ट्रीय शेअर बाजार यांचे निर्देशांक एका वेगळय़ा उंचीवर पोहोचले होते. मात्र अंतिम क्षणी किंचित घसरण होत बाजार बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. जागतिक बाजारांमधील मिळत्या-जुळत्या कलाचा प्रभाव स्थानिक बाजारावर राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमुळे सेन्सेक्स काही वेळ 53,290.81 वर झेपावला होता. परंतु अंतिम क्षणी 18.79 अंकांची घसरण होत निर्देशांक 53,140.06 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 0.80 टक्क्यांनी प्रभावीत होत निर्देशांक घसरुन 15,923.40 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समधील तीन टक्क्यांच्या घसरणीसोबत एचसीएल टेकचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. याव्यतिरिक्त इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक आणि इंडसइंड बँक यांचे समभाग प्रामुख्याने नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील आणि पॉवरग्रिडसह अन्य कंपन्या लाभात राहिल्या आहेत.
बाजारात आयटी आणि आर्थिक समभागांमधील नफावसुलीमुळे आणि विक्रीच्या दबावामुळे निफ्टी घसरला आहे. शुक्रवारी सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी सर्वोच्च पातळी पार केली होती परंतु ती कायम ठेवण्यात बाजाराला अपयश आले असल्याचेही अभ्यासकांनी म्हटले आहे. आशिया आणि अन्य बाजारांमध्ये शांघाय, सिओल आणि टोकियो नुकसानीत राहिले. तर हाँगकाँग तेजीत राहिला आहे. युरोपातील प्रमुख बाजारात तेजीचे संकेत होते.
गुंतवणूकदारांचा कल
दिवसभरात गुंतवणूकदारांचा कल हा प्रामुख्याने औषध आणि त्यानंतर धातूच्या प्रमुख समभागांवर राहिल्याचे पहावयास मिळाले. चांगल्या कमाईची अपेक्षा ठेवत मध्यम आणि लहान कंपन्यांच्या समभागात तेजी कायम राहिल्याचे चित्र राहिले होते.