राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या कन्येलाच पहिला डोस, करण्यात आली अधिकृत नोंदणी
मॉस्को / वृत्तसंस्था
कोरोना विषाणू विरोधातील प्रथम यश रशियाने मिळविले आहे. या देशाने मंगळवारी कोरोनाची पहिली लस आणल्याचे अधिकृतरित्या घोषित केले. रशियाच्या प्रशासनाने या लसीची नोंदणी केली असून आता तिचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन करण्यात येणार आहे. एका विशेष वृत्तानुसार पुतीन यांच्या कन्येलाच या लसीचा पहिला डोस देण्यात आला. स्वतः पुतीन यांनी ही माहिती दिली.
असे असूनही अद्याप युरोपियन देशांमध्ये या लसीसंबंधी साशंकता आहे. ही लस पूर्णतः सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रशियाने सर्व आरोप आणि शंका फेटाळल्या असून लस पूर्णतः निर्धोक आणि परिणामकारक असल्याचा दावा केला. तसेच जगभरात ती लोकप्रिय होईल असे प्रतिपादन केले.
कन्येला ताप आला
आपल्या कन्येला ही लस टोचून घेतल्यानंतर 100 डिग्री फॅरनहाईट ताप आला. मात्र विषाणूविरोधातील लस टोचल्यानंतर असा ताप कोणालाही येऊ शकतो. नंतर तिच्या रक्ताचे परीक्षण केले असता कोरोना विरूद्ध लढण्यायोग्य प्रतिजैविके रक्तात तयार झाल्याचे आढळून आले. याचाच अर्थ आता तिला कोरोना होण्याची भीती उरली नाही. त्यामुळे ही लस परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन पुतीन यांनी या लसीची अधिकृत घोषणा करताना केले.
परीक्षणाचे सर्व टप्पे यशस्वी
प्राण्यांपासून मानवापर्यंत असे सर्व टप्पे या लसीने यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत, असा रशियाचा दावा आहे. मानवावर या लसीची व्यापक चाचणी करण्यात आली. ती अत्यंत समाधानकारकरित्या यशस्वी झाली. त्यानंतरच ही घोषणा करण्यात आली. आमच्या संशोधकांनी अत्यंत काटेकोरपणे आणि सर्व शक्यता लक्षात घेऊन लसीची निर्मिती केली आहे. त्यामुळे कोणतीही शंका घेण्यास जागा नाही. लसीसंबंधी व्यक्त केल्या जाणाऱया सर्व शंका अवास्तव आहेत, असे पुतीन म्हणाले.
चार महिन्यांपासून प्रयत्न
रशियातील संशोधक ही लस निर्माण करण्यासाठी गेले चार महिने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. मात्र, कालांतराने त्यांच्या प्रयोगांना योग्य दिशा मिळाली. कोरोना विषाणूची दुर्बलता शोधण्यात यश आले. त्यानंतर लस बनविण्याचा मार्ग सोपा झाला, असे रशियाच्या संरक्षण विभागाने प्रतिपादन केले आहे. ही लस शोधण्यात या विभागाचेही महत्वाचे योगदान आहे. आता उत्पादनाची यंत्रणा सज्ज होत आहे.
अनेकांवर प्रयोग
रशियात या लसीचे प्रयोग सरकारी अधिकरी, सैनिक. सेनेतील अधिकारी, अनेक राजकीय नेते अशा विविध व्यक्तींवर यापूर्वीच करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष पुतीन यांनीही ती टोचून घेतल्याची वदंता आहे. यामुळे या लसीची विश्वासार्हता वादातीत आहे, असे रशियाचे म्हणणे आहे.
किंमत किती असणार ?
या लसीची किंमत किती असणार, हा प्रश्न आता प्रामुख्याने चर्चिला जात आहे. जगात सध्या किमान 28 कंपन्यांच्या लसी निर्मितीच्या अंतिम टप्प्यात पोहचल्या आहेत. रशियाने यात अव्वल स्थान पटकाविले आहे. याचे श्रेय त्या देशाला निश्चित मिळणार आहे. मात्र भारतासह इतरही देश प्रयत्नांची शर्थ करीत असून ते त्यांच्या ध्येयाच्या जवळ पोहचले असल्याचे सांगण्यात येते. या सर्व देशांना यश मिळाल्यास जगाच्या बाजारात अनेक लसी एकाचवेळी उपलब्ध राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी लस स्पर्धात्मक किमतीला, अर्थातच, अधिकाधिक स्वस्त दरातही उपलब्ध होऊ शकते. मात्र सध्या तिची किंमत काही कालावधीपर्यंत अधिक राहण्याची शक्यता आहे. ती 2 हजार ते 5 हजार रूपयांपर्यंत असू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे.