चिकोडी येथे 30 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले
बेळगाव
इचलकरंजी येथील एका व्यावसायिकाकडून 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना चिकोडी येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दोघे अधिकारी एसीबीच्या जाळय़ात अडकले आहेत. पोलीस उपअधीक्षक महांतेश्वर जिद्दी व त्यांच्या सहकाऱयांनी सोमवारी ही कारवाई केली.
विजयकुमार शांताप्पा शेंडुरी व प्रदीप सूर्यकांत ममदापूर अशी अटक करण्यात आलेल्या दोघा अधिकाऱयांची नावे आहेत. एसीबीचे उत्तर विभागाचे पोलीसप्रमुख बी. एस. नेमगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून या कारवाईत पोलीस निरीक्षक निरंजन पाटील, अली शेख आदी अधिकाऱयांनी भाग घेतला.
चंदूर रोड, इचलकरंजी येथील राजू लक्ष्मण पाच्छापुरे यांनी बोरगाव (ता. चिकोडी) येथे आरपी प्रोडक्शन नामक पान मसाला तयार करणारा कारखाना सुरू करण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. सुपारी व तंबाखूजन्य पदार्थ तयार करणाऱया या कारखान्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी गरजेची होती.
‘कन्सेंट फॉर ऑपरेशन’ ही परवानगी देण्यासाठी अधिकाऱयांनी 30 हजार रुपयांची लाच मागितली होती. 13 मे रोजी राजू यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सोमवारी प्रदूषण मंडळाच्या दोघा अधिकाऱयांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.