प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील काँग्रेस पक्षाला पुनर्जिवित करण्यासाठी काँग्रेस प्रदेश समितीसह बुथपातळीपर्यंत सर्व समित्यांची 25 एप्रिलपर्यंत पुनर्रचना करण्यात येणार आहे व मोठय़ा प्रमाणात सदस्यता मोहीम हाती घेणार असल्याचे काँग्रेस पक्षाचे गोवा प्रभारी कर्नाटकातील आमदार दिनेश गुंडू राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. समन्वय समितीचे अध्यक्ष ऍड. रमाकांत खलप व उपाध्यक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या नेतृत्त्वाखाली शनिवारी समन्वय समितीची बैठक झाली. त्यात पक्षांतर्गत निवडणुका व समित्यांची फेररचना करण्याचा निर्णय झाला, अशी माहिती त्यांनी दिली.
येत्या 12 फेब्रुवारी रोजी दक्षिण गोवा जिल्हा समिती आणि 13 फेब्रुवारी रोजी उत्तर गोवा जिल्हा समितीचे फेररचना होणार आहे. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघ वरिष्ठ नेते आणि आमदारांना विभागून देण्यात येणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 10 मार्चपासून सदस्यता नोंदणी मोहीम प्रारंभ होईल व 25 एप्रिल रोजी प्रदेश समितीची फेररचना होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
विद्यमान प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांना हटवण्यात येणार आहे काय, असे विचारले असता निर्णय व्यक्तीविरोधी नसेल, असे ते म्हणाले. पक्षाच्या हितासाठी आवश्यक वाटेल तो बदल जरुर करण्यात येईल. कुठल्याही नेत्याने तो वैयक्तिक घेता कामा नये, असे ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीची मानसिक तयारी झाली असून प्रत्यक्ष तयारीसाठी पहिली मोहीम पक्षबांधणी करून केली जाणार आहे. नव्या नेत्यांना व युवा नेत्यांना चांगली संधी असून त्यांनी आपणहून पुढे येऊन धुरा सांभाळली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात सर्वत्र हुकूमशाही पहायला मिळत आहे. सगळीकडे असंतोष उफाळून येत असून आंदोलने, मोर्चे देशभर चालू आहेत. देश संकटाच्या दिशेने मार्गक्रमण करीत असून राष्ट्रीय सुरक्षाही धोक्यात आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱयांच्या आंदोलनाला समर्थन देणाऱयांवर सूड उगवण्याचे सत्र सुरू झाले असून समर्थकांना देशद्रोही ठरवले जात आहे. हा अत्याचार थांबवण्यासाठी सत्ता परिवर्तनाची तीव्र आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
आतापासूनच कंबर कसली तर केंद्रात काँग्रेसची सत्ता आणणे सोपे जाईल, असे सांगताना भाजप आपल्या कुकर्मानेच संपणार असल्याचे ते म्हणाले.