प्रतिनिधी / पणजी
गोवा प्रदेश भाजप एसटी मोर्चा अध्यक्षपदी प्रभाकर गांवकर यांची नियुक्ती करण्यात आली असून भाजपच्या इतर मोर्चाचे अध्यक्ष लवकरच नेमण्यात येतील अशी माहिती गोवा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली.
त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की भाजपच्या सर्व मोर्चाची समिती बरखास्त करण्यात आली असून सर्व मोर्चाचे अध्यक्षांची निवड या महिन्याच्या अखेरपर्यंत करण्यात येणार आहे. किसान मोर्चा, महिला मोर्चा, युवा मोर्चा, एससी मोर्चा या सर्वांचे अध्यक्ष लवकरच निश्चित होतील आणि ते जाहीर करण्यात येतील. अध्यक्षांनी नंतर आपापल्या मोर्चाची समिती स्थापन करायची आहे असे ते म्हणाले.
श्री. गावकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यावेळी भाजपचे उपाध्यक्ष रमेश तवडकर व राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर उपस्थित होते. भाजपने एसटी मोर्चाची मोठी जबाबदारी दिली असून ती आपण चांगल्या कार्याने पार पडीन अशी ग्वाही श्री. गांवकर यांनी दिली. पुर्वीचे अध्यक्ष विठोबा वेळीप यांनी मोर्चाची सुत्रे त्यांच्याकडे प्रदान केली.
एसटीचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सोडण्यासाठी एसटी मोर्चा प्रयत्नशील रहाणार असल्याचे श्री. तवडकर यांनी नमूद केले. तसेच भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीची प्रक्रिया चालू असल्याचे ते म्हणाले.