सानिया मिर्झा… भारताची टेनिससम्राज्ञी. सानियाने 2018 मध्ये मुलाला जन्म दिला. टेनिसपटू असणारी सानिया कितीही फिट असली तरी बाळंतपणानंतर तिचंही वजन वाढलं. तिचं वजन 90 किलो झालं होतं. आई झाल्यानंतरचे फोटो पाहिल्यावर हीच का ती सानिया असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला होता. मात्र आता तिने वजन कमी केलं आहे. सानिया 90 किलोवरून 63 किलोवर पोहोचली आहे. नव्या फोटोंमध्ये ती खूपच आकर्षक दिसते आहे. तिने हा बदल कसा घडवला? जाणून घेऊ.
मुळात सानियाला चांगलं दिसायचं होतं. जगासाठी नाही तर स्वतःसाठी… तिला हे वाढलेलं वजन अजिबात आवडत नव्हतं. सुंदर दिसण्यापेक्षाही आपल्याला आतून कसं वाटतं हे सर्वात महत्त्वाचं असल्याचं सानिया सांगते. तंदुरूस्तीमुळे मी आनंदी राहते, मला समाधान वाटतं आणि म्हणूनच मी वजन कमी केल्याचं सानियाचं म्हणणं आहे.
वजन कमी करण्याच्या काळात सानियाने सगळं लक्ष स्वतःवर केंद्रित केलं होतं. या काळात ती शिस्तबद्ध आयुष्य जगली. तिने वजन कमी करून तंदुरूस्त होणं हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवलं होतं. 90 किलोवरून 63 किलोवर यायला सानियाला चार महिने लागले. गरोदरपणाच्या काळात तसंच बाळाच्या जन्मानंतरही सानिया सतत सक्रिय राहिली. ती जीममध्ये गेली. बाळाच्या जन्मानंतर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासनं केलं. बाळ झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसातच ती हिंडूफिरू लागली. प्रयत्न केले तर काहीही अवघड नसतं. आपण इच्छाशक्ती आणि शिस्तबद्ध प्रयत्नांच्या बळावर वजन कमी करून तंदुरूस्त होऊ शकतो, हेच सानियाने दाखवून दिलं आहे. तिचा हा प्रवास प्रत्येक आईला प्रेरणा देणारा ठरू शकतो.