प्रतिनिधी/ बेळगाव
विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सभागृहात प्रबुद्ध भारत बेळगाव आयोजित दोन दिवशीय राष्ट्रीय स्तरावरील स्टेप 2021 चर्चासत्र परिषदेला प्रारंभ झाला.
प्रबुद्ध भारत बेळगाव यांच्यावतीने ‘यंदा सोशल, टेक्नॉलॉजिकल, एज्युकेशन व पॉलिटिकल’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा राज्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लाई, व्हीटीयुचे कुलगुरु डॉ. करिसिद्दप्पा, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु एम. रामचंद्रगौडा, कर्नाटक विद्यापीठ धारवाडचे कुलगुरु प्रा. के. बी. गुदासी, केएसआरडीपीआरयुचे प्रा. बसवराज लकण्णावर, कुलगुरु प्रा. सिंधू अलगुर, नंदकुमार जी, डॉ. सुशांत जोशी उपस्थित होते.
पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्वामी विवेकानंद फोटो पूजन करण्यात आले. डॉ. प्रणव अध्यापक यांनी स्वागतगीत गायिले. प्रबुद्ध भारत बेळगाव समन्वयक सचिन सबनीस यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय स्वागत व प्रास्ताविक केले.
यानंतर सचिन सबनीस व प्रबुद्ध भारत बेळगाव यांच्या हस्ते राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लाई, यांचा म्हैसूर फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर राज्यपाल पिल्लाई यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. करिसिद्दप्पा पा. रामचंद्रगौंडा, प्रा. के. बी. गुदसी, प्रा. सिंधू अलगूर, बसवराज लकण्णावर, डॉ. व्ही. ए. कोठीवाले यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी एम. आर. वेंकटेश लिखित ‘स्टेनिंग बॅलन्स द इटर्नल वे पुस्तकांचे प्रकाशन राज्यपाल पिल्लाई यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर राज्यपाल पिल्लाई विनय शस्त्रबुद्धे, सामाजिक व शैक्षणिक विषयावर डॉ. व्ही. बी. आरती, स्मिता सुरेबानकर, डॉ. जगदीश कुमार, टेक्नॉलॉजी या विषयावर जयंत सहस्त्रबुद्धे, जयशंकर ए. एल तर भारतीय स्वातंत्र्याची प्रवास गाथा त्यावर जे. नंदकुमार यांनी उपस्थित श्रोत्यांना मार्गदर्शन केले. तर शेवटच्या सत्रात संस्कार भारतीच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालन संदीप नायर तर डॉ. सुशांत जोशी यांनी आभार मानले.