सचिव राजेंद्र भोबे यांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
प्रबोधन शिक्षण संस्था पर्वरी संचलित प्राथमिक विभागाच्या नूतन इमारतीचा पायाभरणी सोहळा दि. 28 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते हाऊसिंग बोर्डच्या नियोजित जागेत, नाना नानी उद्यानाजवळ होणार असल्याची माहिती प्रबोधन शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र भोबे यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वालावलकर,प्रबोधन शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य दत्ता नाईक, राजकुमार देसाई, व्यवस्थापकीय सदस्य अवधूत पर्रीकर उपस्थित होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय बंदर व पर्यटक राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा हाऊसिंग बोर्डचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर, टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेडचे अध्यक्ष विवेकानंद पत्की उपस्थित राहणार आहेत. तसेच पर्वरी परिसरातील सर्व पंचायतीचे सरपंच या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. पायाभरणी समारंभ नाना नानी उद्यानाजवळच्या हाऊसिंग बोर्डच्या जागेत सकाळी 8.45 वा. मुख्य़मंत्र्यांच्याहस्ते होईल. त्यानंतर जाहीर कार्यक्रम विद्याप्रबोधिनी शिक्षण संकुल पर्वरी येथे होणार आहे अशी माहिती भोबे यांनी यावेळी दिली.
प्रबोधन शिक्षण संस्थेशी संलग्न सर्व संस्था एकाच छताखाली कार्यरत आहेत. त्यांचा अजून विस्तार व्हावा त्याचबरोबर माध्यमिक विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय यांच्या शैक्षणिक उपक्रमांसाठी जागा अपुरी पडू नये यासाठी राज्य सरकारच्या हाऊसिंग बोर्डने 2000 चौ.मीचा भूखंड प्रबोधन प्राथमिक विद्यालय बांधकामासाठी दिलेला असून 3100 चौ.मी जागेत इमारत बांधण्यात येणार आहे. तीन मजली इमारतीत पूर्व प्राथमिक, नर्सरी, प्राथमिक हे तीन वर्ग हळुहळु कार्यरत होईल. तळमजल्यावर 500 चौ.मी जागेत मुलांकरिता खेळण्यासाठी जागा असेल पालकांसाठी वेटिंग रूम, आजारी मुलासाठी एक खोली असेल. नर्सरीच्या विद्यार्थ्यांसाठी खेळण्याची जागा असेल. वरतळमजल्यावर नर्सरी व पूर्वप्राथमिक विद्यार्थ्यांसाठी वर्ग असतील. पहिल्या व दुसऱया मजल्यावर 15 वर्ग हवेशीर तयार करण्यात येणार आहेत आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच येत्या दीड वर्षात नर्सरी आणि पूर्वप्राथमिक सुरू करणार त्यानंतर प्राथमिक वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अवधूत पर्रीकर यांनी दिली.