प्रतिनिधी/ संकेश्वर
येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर दत्तात्रय नलवडे यांचे शनिवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. निधनसमयी ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली, दोन मुले असा मोठा परिवार आहे.
प्रभाकर नलवडे गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव शहरात वास्तव्यास होते. माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद यांचे ते निकटवर्तीय होते. शंकरानंद यांनी स्थापन केलेल्या जागृती को-ऑप. सोसायटीचे संचालक म्हणून त्यांनी अनेक वर्षे कार्यभार सांभाळला होता. बेळगाव शहरासह जिल्हय़ातील संघ-संस्थांचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सार्वजनिक वाचनालयाचे ते सदस्य होते. त्यांनी श्रीराम ट्रेडर्स या नावाने आपला व्यवसाय सुरू केला.
शनिवारी दुपारी त्यांचे पार्थिव बेळगावहून संकेश्वर येथील श्रीराम निवासस्थानी आणण्यात आले. याठिकाणी संकेश्वरवासियांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. सायंकाळी हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.