जिल्हय़ातील आठ पालिकांमध्ये कार्यवाहीस प्रारंभ
प्रतिनिधी /कराड
राज्यातील सुमारे 215 नगरपालिकांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दोन सदस्यीय प्रभागांनुसार नव्याने प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार पालिका प्रशासनांकडून कच्चे प्रारूप तयार करण्यास आजपासून प्रारंभ केला आहे.
सन 2011 सालच्या जनगणनेनुसार लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग रचना करण्यात यावी. यासाठी प्रथम पालिकेची सदस्य संख्या निश्चित करावी, असे म्हटले आहे. प्रभाग रचना करताना झिगझॅग पद्धतीने करावी, तीन सदस्यांचा भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन करावा. तशी स्थिती नसल्यास तो शेवटचा ठेवण्यात यावा, नैसर्गिक सीमा लक्षात घेऊन प्रभाग निश्चित करावेत, प्रगणक गट फोडू नयेत, अशा विविध सूचना आयोगाकडून देण्यात आल्या आहेत.
गेल्या महिन्यात एकसदस्यीय प्रभागांनुसार प्रभागांचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र त्यानंतर शासनाने नगरपालिकांसाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यास राज्यपालांनी नुकतीच मंजुरी दिली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्याचे आदेश दिले आहेत. सातारा जिल्हय़ात सातारा, कराड, फलटण, म्हसवड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी या आठ पालिकांमध्ये दोन सदस्यीय प्रभागांनुसार निवडणूक होणार आहे.