आमदार शिवेंद्रराजेंच्या हस्ते उद्घाटन
प्रतिनिधी /सातारा
प्रभाग 19 मध्ये वॉर्डात रवी ढोणे यांच्या माध्यमातून लसीकरण मोहिम राबवण्यात आलेली आहे. कोरोनावर मात करायची असेल तर लसीकरण वाढवले पाहिजे. ही बाब सगळय़ांनाच पटलेली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या वॉर्डातील नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून नगरसेवक रवी ढोणे यांनी लसीकरण मोहिम हाती घेतली आहे, असे मत आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केले.
प्रभाग 19 मध्ये नगरसेवक रवी ढोणे यांच्यावतीने आयोजित लसीकरण मोहिमेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजू भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, रवी ढोणे यांनी आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेला सहाशे ते सातशे नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मोठया प्रमाणात लसीकरण प्रभागात होत आहे. लसीकरण झालेतर कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होईल लोकांच्या मनातील भिती कमी होईल. लस घेतली म्हणजे कोरोना होणार नाही असे कोणी भ्रमात राहू नये मास्क वापरावा. गर्दी टाळवी. गरज पडल्यावरच घरातून बाहेर पडावे. अशी माझी विनंती आहे, असे आवाहन त्यांनी केले. रवी ढोणे म्हणाले, माझ्या प्रभागात ही दुसरी मोहिम सुरु आहे. लोकांची गैरसोय होवू नये म्हणून लसीकरण मोहिम घेतली जात आहे. सर्वांच्या सोयीसाठी ही मोहिम राबवण्यात आली आहे. पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोसही देण्याचे काम केले जात आहे. आमचे दैवत बाबाराजे, कर्तव्य सोशल ग्रुपचे वेदांतिकाराजे, आमचे राजू भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम घेतली असून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मी एकटा कुठलीही गोष्ट करु शकत नाही. कोरोनाची लढाई सगळयांनी एकत्र लढायची आहे. कोरोनाला हरवण्यासाठी हातात हात घालून काम करायचे आहे. वॉर्डात चांगले उपक्रम होतात. चांगल्या योजना होतात. मित्रमंडळ, नागरिक यांच्या पाठींब्यामुळे कार्यक्रम यशस्वी होतात. भविष्यात नागरिकांना सोयीसुविधा कशा मिळतील, नागरिकांचे आरोग्य कसे होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.