प्रतिनिधी / मडगाव
मडगाव पालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील रहिवाशांसह मित्रवर्गाने पालिका निवडणूक लढविण्याचा आग्रह धरल्याने वरील प्रभागातून स्वतंत्र उमेदवार म्हणून आपण उमेदवारी दाखल करून प्रचारास प्रारंभ केला असता आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे माजी नगरसेवक दामोदर नाईक यांनी सांगितले आहे.
नाईक यांनी मावळत्या पालिका मंडळात शहरी भागातील प्रभाग 14 चे नगरसेवक म्हणून पाच वर्षे प्रतिनिधीत्व केले. 2015 मध्ये स्वतंत्र उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढविली व ते विजयी झाले. नंतर स्थानिक आमदार दिगंबर कामत यांच्याशी त्यांनी जवळीक साधली होती. त्यामुळे कामत यांनी प्रभाग 14 मधून मॉडेल मडगाव या काँग्रेस पॅनलमधून त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आरक्षणासंदर्भातील निर्णयानंतर प्रभाग 14 हा अनुसूचित जातींतील महिलांसाठी राखीव करण्यात आल्याने त्यांना या प्रभागावर पाणी सोडावे लागले.
कामत यांनी अन्य प्रभागात त्यांना उमेदवारी देऊन सामावून न घेतल्याने ते निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत मिळत होते. मात्र प्रभाग 14 चे नगरसेवक असताना आपण शहरी भागातील कचरा समस्यांचे निवारण, गटारे-नाले यांची साफसफाई व उभारणी तसेच भूöगटार जोडण्या देण्यासाठी केलेले कार्य पाहून प्रभाग 22 मधील रहिवासी तसेच आपले भाऊ शैलेश नाईक यांच्या तेथील मित्रमंडळीने वारंवार आग्रह केल्यानंतर आपण ही निवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून लढविण्याचा निर्णय घेतला, असे नाईक यांनी सांगितले.
आपला पिंड समाजकार्याचा असून प्रभाग 14 प्रमाणे प्रभाग 22 मध्ये कामे करण्याचे आपले प्रयत्न असतील. मतदारांच्या भेटी घेतल्या असता आपणास चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. येथील मतदार आपल्याला त्यांची कामे करून देण्यासाठी निवडून देतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.