बेळगाव / प्रतिनिधी
महापालिका प्रभारी आयुक्तपदाची सूत्रे स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक प्रवीण बागेवाडी यांच्याकडे सोपविण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी बजावला होता. अखेर शुक्रवारी प्रवीण बागेवाडी यांनी महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारून कामकाजास प्रारंभ केला. त्यामुळे मनपाची निवडणूक प्रभारी आयुक्तांच्या उपस्थितीत होणार आहे.
महापालिका आयुक्त जगदीश के. एच. हे दि. 26 जुलैपासून रजेवर गेले आहेत. 15 दिवसांसाठी रजा घेतली होती. पण सदर रजेचा अर्ज जिल्हाधिकाऱयांनी नगरविकास खात्याकडे पाठविला होता. त्यावेळी नगरविकास खात्याने रजा मंजूर करून प्रभारी कार्यभार प्रवीण बागेवाडी यांच्याकडे सोपविला होता. पण रजा संपल्यानंतरही मनपा आयुक्त जगदीश के. एच. रुजू झाले नाहीत. त्यामुळे आयुक्ताविना मनपाची निवडणूक होणार का? असा मुद्दा निर्माण झाला होता.
मनपाचे कामकाज करण्यासाठी प्रमुख अधिकारी नसल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी मनपा आयुक्तपदाचा कार्यभार प्रवीण बागेवाडी यांच्याकडे सोपविण्याचा आदेश गुरुवारी सायंकाळी बजावला होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी प्रवीण बागेवाडी यांनी मनपा कार्यालयात उपस्थित होऊन आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला आहे.