क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
मागील चार सामन्यांत विजय मिळविण्यात अपयशी ठरलेल्या एटीके मोहन बागानसमोर तगडय़ा नॉर्थईस्ट युनायटेडचे आव्हान असणार आहे. नॉर्थईस्ट युनायटेडने मागील लढतीत विजय मिळविताना आपलं मनोबल उंचावले आहे. त्यामुळे एटीके मोहन बागानसाठी हा सामना जरी सोपा वाटत असला तरी प्रत्यक्षात त्यांचा कस लागणार आहे. फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर हा सामना होईल.
सलग चार सामन्यांत विजय मिळविण्यात अपयशी ठरल्यानंतर मोहन बागान यांनी प्रमुख प्रशिक्षक आतोनियो लोपेझ हबास यांच्यासोबतचा करार शनिवारी संपुष्टात आणला. एटीकेचा संघ सध्या गुणतालिकेत 8 गुणांनी सातव्या स्थानावर आहेत. हबास यांच्या प्रशिक्षणाखाली मोहन बागान एटीकेने 2015 व 2019-20 मध्ये आयएसएलचे जेतेपद मिळविले होते आणि दोन आयएसएल जेतेपदे मिळविणारे ते पहिले प्रशिक्षक आहेत. हबास यांच्या स्थानावर आता एसी गोवाचे प्रशिक्षकपद सोडलेले जुआन फॅरांडो प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. मात्र आजच्या सामन्यात एटीके प्रमुख प्रशिक्षकाविना खेळतील.
नॉर्थईस्ट युनायटेडविरूद्धच्या सामन्यात एटीकेला त्यांच्या बचावफळीत सुधारणा करण्याची खरी गरज आहे. त्यांच्याविरूद्ध प्रतिस्पर्धी संघांनी 13 गोल्स केले आहेत. सध्या हबास हे प्रशिक्षक नसल्याने खेळाडूच मुख्य भूमिकेत आहेत. सध्याच्या परिस्थितीचा संघाच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही, असे एटीकेचे साहाय्यक प्रशिक्षक बॅस्टॅब रॉय म्हणाले. दुसरीकडे नॉर्थईस्ट युनायटेड संघ 7 गुणांनी नवव्या स्थानावर आहे. त्यांनी मागील लढतीत एससी ईस्ट बंगालचा 2-0 गोलानी पराभव केला होता. बचावपटू हर्नान सँटाना आणि डिशॉर्न ब्राऊन यांच्या अनुपस्थित नॉर्थईस्ट युनायटेडने मागील सामन्यातील दुसऱया सत्रात चांगला खेळ केला. एटीके संघ चांगला आहे, मात्र आम्ही फक्त आमचा विचार करतोय. मागील सामन्यातील आमची कामगिरी चांगली झाली होती आणि त्यात सातत्य राखण्याची गरज आहे. खेळाडू सकारात्मक आहेत आणि तेही याच मानसिकतेनं खेळण्याचा त्यांचा निर्धार असल्याचे नॉर्थईस्ट युनायटेड प्रशिक्षक खलीद जमील म्हणाले.