मौनी अमावस्येची पर्वणी : नौकाविहाराचा घेतला आनंद
वृत्तसंस्था / प्रयागराज
मौनी अमावस्येच्या पर्वणीनिमित्त काँग्रेस महासचिव प्रियंका वड्रा यांनीही संगमक्षेत्री धार्मिक स्नान केले आहे. तेथे स्नान आणि पूजा केल्यावर त्यांनी नौकेतून सैरही केली आहे. नौकेत बसल्यावर काही वेळाने त्यांनी नौका चालविण्याचाही अनुभवही घेतला आहे.
प्रयागराजमध्ये संगम तटावर गुरुवारी माघ मेळय़ाचे तिसरे स्नानपर्व होते. मौनी अमावस्येमुळे मध्यरात्रीपासूनच भाविकांची मोठी गर्दी दिसून आली होती. प्रयागराज दौऱयात प्रियंका यांनी सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरूंचे निवासस्थान राहिलेल्या आनंदभवनला भेट दिली आहे. तेथील अनाथालयातील मुलांसोबत त्यांनी काही वेळ घालविला आहे. प्रियंका वड्रा यांनी याचबरोबर मनकामेश्वर मंदिरात जात दर्शन घेतले आहे. उत्तरप्रदेशात 2022 मध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रियंका वड्रा यांचे राज्यातील दौरे वाढले आहे. प्रियंका वड्रा बुधवारीच किसान पंचायतमध्ये सामील झाल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात प्रियंका यांनी गंगायात्रेतूनच केली होती.