वार्ताहर / प्रयाग चिखली
गुरुवारी पहाटेपासून वडणगे शिवारात असलेला गवा दुपारी दोनच्या सुमारास वडणगे फाट्यावरून कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग ओलांडून पश्चिम बाजूस आंबेवाडी गावच्या उसाच्या शिवारामध्ये शिरला. यावेळी वनविभाग पोलीस यांनी महामार्गावरील वाहतूक काही काळ थांबवली त्यानंतर तीन वाजण्याच्या सुमारास गव्याचे दर्शन प्रयाग चिखली येथील मसोबा मंदिर परिसरात ऊसाच्या शेतात झाले. यावेळी चिखली व आंबेवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या मध्ये घबराट निर्माण झाली होती.
त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजे साडेतीन वाजता सदरचा गवा नदी काठावरून शिंगणापूर बंधारा येथे पोहोचला दरम्यान पोलिस आणि वन विभाग टीम गव्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होती दुपारी साडेतीन वाजता शिंगणापूर बंधारा येथून गवा नदीपात्र ओलांडून शिंगणापूर गावाच्या शिवारात गेला दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत चिखली आंबेवाडी परिसरात गव्याच्या आगमनाने घबराटीचे वातावरण दिसले.
या परिसरातील काम करणारे शेतमजूर, शेतकरी यांनी आपली कामे काही काळ बंद ठेवली आणि सुरक्षित स्थळी पलायन केले चार वाजता गवा नदी पात्र ओलांडून शिंगणापूरच्या दिशेने गेल्यामुळे चिखली व आंबेवाडी परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला दरम्यान दिवसभरात परिसरात आगमनाची व जाण्याची चर्चा चालू होती.