नूतन बुडा आयुक्त जी. टी. दिनेशकुमार यांची माहिती : अखेर कार्यभार स्वीकारला
प्रतिनिधी /बेळगाव
बुडाच्यावतीने राबविण्यात येणाऱया वसाहत योजना राबविण्यासाठी प्राधान्य देणार असून प्रलंबित योजना लवकरच मार्गी लावणार आहे. तसेच 50ः50 तत्त्वानुसार जमीन मालक व बुडा संयुक्तरीत्या मिनी लेआऊट राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नवनिर्वाचित आयुक्त जी. टी. दिनेशकुमार यांनी ‘तरुण भारत’ला मंगळवारी दिली.
नवनिर्वाचित बुडा आयुक्तांनी मंगळवारी दुपारी थेट बुडा कार्यालयात दाखल होऊन प्रीतम नसलापुरे यांची प्रतीक्षा न करता आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी कार्यभार स्वीकारण्याची शासकीय प्रक्रिया पूर्ण केली. एरव्ही मावळत्या आयुक्तांकडून पदाचा कार्यभार हस्तांतर केला जातो. पण मावळते आयुक्त प्रीतम नसलापुरे शहरात उपस्थित नसल्याने सोमवारी कार्यभार हस्तांतर प्रक्रिया रखडली होती. मंगळवारी कार्यभार घेऊन बुडा आयुक्त जी. टी. दिनेशकुमार यांनी कामकाजास प्रारंभ
केला.
जी. टी. दिनेशकुमार हे 2010 बॅचचे केएएस श्रेणीतील अधिकारी आहेत. मंगळूर नगर प्राधिकरण मंडळाचे (मुडा) आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांची बेळगाव नगर प्राधिकरण मंडळ कार्यालयात आयुक्तपदी नियुक्ती झाली. यापूर्वी बेळगावमध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि विशेष भू-संपादन अधिकारी म्हणून कामकाज केले आहे. त्यामुळे बेळगाव परिसराचा त्यांना अनुभव आहे.
50ः50 तत्त्वावर बुडाही जमीन मालकांसोबत लेआऊट करणार
सध्या बुडाकडून कणबर्गी योजना राबविण्यात येत असून योजनेचे काम प्रलंबित आहे. हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. किमान दहा एकर व त्याहून अधिक जमीन असलेले जमीन मालक लेआऊट करण्यास इच्छुक असल्यास संयुक्तरीत्या लेआऊट करण्यास प्राधान्य देण्यात येईल. मंगळूर नगर प्राधिकरण मंडळाच्यावतीने अशा प्रकारचे चार लेआऊट तयार करण्यात आले असून आणखी काही लेआऊट निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. अशा प्रकारचे मिनी लेआऊट बेळगावमध्ये राबविण्यास प्राधान्य देणार आहे. जमीन मालक व लँड डेव्हल्पर्स 50ः50 या तत्त्वावर संयुक्तरीत्या लेआऊट निर्माण करतात. त्याप्रमाणे बुडाही जमीन मालकांसोबत लेआऊट करणार असल्याचे नवनिर्वाचित बुडा आयुक्त जी. टी. दिनेशकुमार यांनी सांगितले.